मुंबई : कोरोनाच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील कामाठीपुरा परिसरात राहत देह विक्री करणाऱ्या महिलांनी घरांचं भाडं न दिल्यामुळे त्यांनाही घरं सोडण्यासाठी त्या-त्या घर मालकांनी तगादा लावलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं कुठे जायचं असा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. आम्हाला सरकारने मदत करावी आणि आमचे घर भाडं माफ करावं, अशी मागणी या महिलांनी केलेली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच क्षेत्रामध्ये कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. या फटक्यातून कामाठीपुरा परिसरातील महिला देखील वाचलेल्या नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून विविध संस्थांच्या वतीने या महिलांना अन्नधान्य पुरवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कसेतरी दिवस काढणाऱ्या महिला मात्र पंधरा दिवसांपासून भीतीच्या छायेत वावरत आहेत. या महिला ज्या घरामध्ये भाड्याने राहत आहेत, त्या घरमालकांनी गेल्या 3 महिन्याच्या थकीत घर भाड्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावलेला आहे.


मुंबईतील व्यावसायिकाची दहापट वाढीव वीज बिलाविरोधात हायकोर्टात धाव

गेल्या तीन महिन्यांपासून एकही रुपयाची कमाई नाही

कोरोनामुळं कामाठीपुरा परिसरात एकही गिराईक आलं नसल्यामुळे महिलांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. तसंच कोरोनाचं संक्रमण झाल्यानं मृत्यू होत असल्याची भीती महिलांच्या मनात बसल्यामुळे त्यांनी स्वतःहून गेल्या तीन महिन्यांपासून घरातून बाहेर पडणं बंद केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या महिलांकडे पैसा आणि अन्नधान्य नाही. गेल्या तीन महिन्यांपासून महिलांकडे व्यवसाय नसल्यामुळे पैसाअडका शिल्लक नाही. त्यामुळे त्यानी राहत असलेल्या घराचं भाडं भरलेलं नाही. घर मालक आता या महिलांकडे घर भाडे देण्यासाठी तगादा लावत आहेत. येत्या दोन दिवसात जर घरभाडं दिलं नाही तर साहित्य रस्त्यावर फेकून देण्याची धमकी अनेक घर मालकांनी या महिलांना दिलेली आहे. त्यामुळे या महिलांच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे. आज दिवसभर संपूर्ण परिसरातील सर्व महिलांनी आपल्या नावांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे. या परिसरात तब्बल सहा हजाराहून अधिक महिला वर्षानुवर्ष देहविक्रीचा व्यवसाय करत आहेत. अशा अडचणीच्या काळात राज्यसरकारने, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत करावी आणि आमचं घर भाडं माफ करावं अशी मागणी या महिलांनी केलेली आहे.
कामाठीपुरातील घरं

कामाठीपुरा परिसरात 14 गल्ल्यांमध्ये अनेक 3 मजली चाळी आहेत. 10 वी ते 14 वी गल्ल्यांमध्ये या महिला देहविक्रीचा व्यवसाय करत आहेत. या प्रत्येक चाळी मध्ये 5 बाय 5 अश्या छोट्या खोलीत 2 खाटा बसतील इतकी जागा असते. याच खोलीत 2 मुली किंवा 2 महिला राहतात. खोलीत त्या आपला व्यवसाय करतात आणि तितेच राहतात. या खोलीला एका महिलेसाठी दिवसाला 250 रुपये भाडे असते. दोन्ही महिला मिळून मालकाला दिवसाला पाचशे रुपये भाडे देतात. यावरुन साधारण महिन्याला या दोन्ही महिला 15 हजार रुपये भाडं देतात.
आशा (नाव बदललेलं आहे)

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांना फटका बसलेला आहे. यातून कामाठीपुरा परिसरातील महिला देखील वाचलेल्या नाहीत. जवळ पैसा नाही, खायला अन्नधान्य नाही, अशा परिस्थितीत आपण घर भाडे कसं भरायचं या चिंतेत आम्ही आहोत. व्यवसाय सुरू असताना गोडीगुलाबीने वागणारे लोक आता फोन उचलत नाहीत. उसने पैसे देत नाहीत. ओळख दाखवत नाहीत. अशामुळे आता जगणे मुश्किल झाले आहे. त्यात घर मालक दररोज येऊन धमकी देत आहेत. काय करावं कळत नाही.
सीमा (नाव बदललेलं आहे)

मी या धंद्यात चुकून आले आणि मला याचा आयुष्य भरासाठी पश्चाताप होतोय. यातून बाहेर पडण्याची शक्यता नाही असं वाटतंय म्हणून मन मारुन मी हा व्यवसाय करत आहे. अनेक संकटांना आम्ही दररोज तोंड देत आहोत. आता कोरोनाचं नवं संकट. मला जगणं मुश्कील झालंय. त्यात घर भाडं वसूल करण्यासाठी मालकांचा फोन दररोज येत आहे. राज्य सरकार वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी मदत करत आहे. त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी कामाठीपुरा परिसरातील 5 हजार महिलांना मदत करावी आणि आमचं घर भाडं माफ करावं इतकीच माफक अपेक्षा आमची राज्य सरकारकडे आहे.

coronavirus | मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग