मुंबई : मुंबईतल्या दूर्दैवी घटनांची मालिका थांबत नाही आहे. गोरेगांव आणि वरळी उदाहरण ताज असतानाचं मुंबईतल्या धारावीत नाल्यात पडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. नाल्यात किंवा गटारात पडून मृत्यू झाल्याची गेल्या पाच दिवसातली ही तिसरी घटना आहे. अमित जैस्वाल असं धारावीत नाल्यात पडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. नाल्याजवळ खेकडा पकडायला गेला असताना या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर या ठिकाणी कोणतीही संरक्षक भिंत किंवा जाळी नसल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. VIDEO | धारावीत नाल्यामध्ये पडून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू | एबीपी माझा दरम्यान याआधी गारेगावमध्ये दिव्यांश सिंह हा चिमुकला गटारात पडून आता पाच दिवस उलटले तरी त्याचा शोध लागत नाही आहे. दुसरीकडे कोस्टल रोडच्या खड्ड्यात पडून परवाच 12 वर्षीय मुलाचा जीव गेला. हे कमी की काय तर आज पुन्हा एकदा खड्ड्यात पडून एका मुंबईकरानं आपला जीव गमावलाय. देशाची आर्थिक राजधानीची महापालिका, सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारी श्रीमंत महापालिका असा लौकिक असणाऱ्या मुंबई महापालिकेनं हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. नालेसफाई, पावसाळ्यातील पाण्याचं नियोजन, खड्डे या सगळयात सपशेल अपयशी ठरणाऱ्या महापालिकेला आता मुंबईकरांच्या जीवाचीही पर्वा नाहीये का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.