मुंबई : गाडी वळवायला त्रास झाल्याच्या क्षुल्लक कारणातून वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील भांडुप भागात घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे.


भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खाडे यांनी तुळशेत पाडा भागात भररस्त्यामध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. संजय शुक्ला असं तक्रारदार दुचाकीस्वाराचं नाव आहे.

संजय शुक्ला दोन दिवसांपूर्वी दुचाकी आपल्या दुकानासमोर उभी करुन दुकानात गेले. याच वेळी भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खाडे त्यांच्या गाडीने जात होते. अचानक त्यांना काही कामानिमित्त मागे फिरावं लागलं. मात्र गाडी यूटर्न घेताना संजय शुक्लांची दुचाकी वाटेत येत होती.

पारा चढलेल्या खाडेंनी दुचाकी बाजूला करतानाच संजय शुक्ला यांच्या कानाखाली वाजवण्यास सुरुवात केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिस उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी कॅमेरासमोर बोलण्यास मात्र नकार दिला आहे. संजय शुक्ला यांनी उपायुक्तांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.