मुंबई : संजय राऊतांच्या विरोधातील मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतल्यानंतर राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. दादा भुसे यांच्यावर मूळ आरोप अद्वय हिरेंनी केले होते, ते आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे हा खटला चालवण्याची जबाबदारी भाजपची असून आम्ही त्यासाठी रक्त का आठवायचं? त्यामुळेच आम्ही आनंदाने आणि हसत हसत यातून बाहेर पडलो असं उत्तर संजय राऊत यांनी भातखळकरांना दिलं.

संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील खटला मिटल्यानंतर दोघेही मालेगाव कोर्टाच्या परिसरात हसत हसत बाहेर येताना दिसले. त्यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकरांनी राऊतांवर टीका केली. 'माफी मागून आनंदी झालेला जगातला पहिला माणूस असावा..' अशा शब्दात भातखळकरांनी टीका केली.

काय म्हटलंय संजय राऊतांनी? 

अतुल भातखळकरांच्या या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं की, "अतुल जी, माणसाने पाप केले नसेल तर तो नेहमीच आनंदी राहील. दादाजी भुसे यांच्यावर मूळ आरोप अद्वय हिरे यांचे होते, त्यांनी गिरणा कारखान्यातील व्यवहाराबाबत आधीच खटला दाखल केला आहे. हिरे यांनी आता भाजपात प्रवेश केल्यामुळे हा खटला चालवण्याची जबाबदारी भाजपची आहे. आम्ही का रक्त आटवायचे? आम्ही या खटल्यातून आनंदाने आणि हसत हसत बाहेर पडलो आहोत. समजलं?"

खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्याविरोधातील मानहानीचा खटला शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंनी मागे घेतला आहे. संजय राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याने खटला मागे घेतल्याचं दादा भुसेंनी सांगितलं. तर दादा भुसेंनी समजूतदारपणा दाखवला अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीला संजय राऊत आणि दादा भुसे एकत्र कोर्टात गेले. सुनावणीनंतर दोघांनी एकत्रच पत्रकारांना खटला सामोपचाराने खटला मागे घेतल्याचं सांगितलं.

संजय राऊत यांनी माफी मागितलीय, यामुळे खटला मागे घेतल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली. तर आम्हाला ज्यांच्याकडून माहिती मिळाली ते आता आमच्यासोबत नाहीत. तसेच तब्येतीच्या कारणास्तव आपल्याला प्रवासही जमत नाही. त्यामुळे हे प्रकरण आपण संपवत असल्याचं संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण? 

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये  22 जून 2025 ला कृषिमंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत बातमी प्रसिद्ध झाली होती. पूर्वीचे शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बातमी प्रसिद्ध झाली होती. या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर न राहिल्याने यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

आता मात्र या प्रकरणात कोणतीही सत्यता नसल्याचं निदर्शनास आल्याचा माफीनामा संजय राऊतांनी मालेगाव कोर्टात सादर केला. यानंतर मंत्री दादा भुसेंनीही संजय राऊतांवर दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला. 

गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअर्समध्ये 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. राऊतांनी हा आरोप अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केला होता. पण अद्वय हिरे आता सध्या भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी हा विषय संपला असल्याचं सांगत माफीनामा सादर केला.

ही बातमी वाचा: