Sanjay Raut On Eknath Shinde and Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा, असंही राऊत म्हणाले. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच त्यांनीही पाळला, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, अडीच वर्षाचा करार होता, त्याचं पालन आत्ता भाजपानं केलं आहे. तेव्हा शब्द पाळला असता, तर अडीच वर्षांचा काळ आत्ता कुणाचातरी एकाचा संपला असता. शिवसेना भाजपा युती कायम राहिली असती. पण कालच्या निर्णयानंतर भाजपाच्या हाती काय लागलं? या किंवा त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्याच माणसाकडे पाच वर्ष गेलं. शिवसैनिक म्हणूनच त्यांना तिथे घेतलंय. दुसऱ्या कुठल्या पक्षाचे म्हणून त्यांना तिथे घेतलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम त्यांनी केलंय, असं ते म्हणाले.
संजय राऊतांनी म्हटलं की, नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रीमंडळाचं स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून अडचणी निर्माण करण्यात आल्या. पण अशी कोणतीही अडचण आम्ही निर्माण करणार नाही. जनतेच्या कामांना प्राधान्य असेल. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला पुढे न्यावं या शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्र आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असंही ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदेंना अनुभव आहे. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस आता त्यांचे राईट हँड मॅन आहेत. दोघांनी मिळून महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावावेत. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न त्यांनी मार्गी लावावेत. हे करत असताना प्रशासन, पोलीस दल नि:पक्षपातीपणे काम करतील याची काळजी घ्यावी. फडणवीसांना राज्य चालवण्याचा जास्त अनुभव आहे,असंही राऊत म्हणाले.
राऊतांनी म्हटलं की, भाजपानं शिवसैनिक म्हणून त्यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सगळ्यांवरच उपकार आहेत. भाजपासोबत शिवसेनेतून फुटलेल्या एका गटाचं सरकार आलं आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे स्वत:ला शिवसेनेचे म्हणत राहतील, तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावर ठेवलं जाईल, असंही ते म्हणाले. शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं होतं, तर नारायण राणेंना का मुख्यमंत्री केलं नाही? तेही शिवसैनिकच होते. त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं, तर आम्ही बोललो असतो की सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. राजकारण सोयीनुसार आणि संधी पाहून केलं जातं. त्यांच्या पक्षात अनेक शिवसैनिक गेलेत. पण त्या कुणालाही त्यांनी मुख्यमंत्री केलं नाही. शिवसेना फोडण्यासाठीचा प्लॅन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. जिथे ठाकरे, तिथे शिवसेना. मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं आता म्हणणार नाही,असं राऊत म्हणाले.