"इंग्रज आणि पेशव्यांमधील लढाईला 200 वर्ष झाल्याने भीमा-कोरेगाव इथे दरवर्षी हजारो लोक येतात. एरव्ही इथे 15 ते 20 हजार लोक येतात, मात्र यंदा अंदाजे साडेतीन लाख लोक आले होते," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दंगलीचा प्रयत्न मात्र पोलिसांची सजगता
मुख्यमंत्री म्हणाले की, "मात्र डाव्या आणि सामाजिक संघटनांनी इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांच्या सहा कंपन्यांना इथे पाचारण करण्यात आलं होतं. इथे दंगल घडावी, असाच प्रयत्न होता. परंतु पोलिसांच्या सजगतेमुळे दंगल घडली नाही. दगडफेक आणि गाड्यांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या, मात्र पोलिसांनी अतिरिक्त कुमक लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रीपर्यंत सर्व उपस्थितांना बसमध्ये बसवून सुखरुप घरी पोहोचवण्यात आलं."
मृताच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत
या घटनेनंतर एका तरुणाचा मृतदेह सापडला. हे प्रकार कोण जाणीवपूर्वक करतंय ह्याचा राज्य सरकार छडा लावणार आहे. ह्या घटनेला हत्या समजून त्याची सीआयडी चौकशी करणार आहे. मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच ज्यांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, त्यांनाही राज्य सरकारकडून मदत करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अफवा पसरणाऱ्यांवर कारवाई
"माध्यमांचे आभार मानतो कारण त्यांनी संयम दाखवल्यामुळे कोणत्याही अफवा पसरल्या नाहीत. आजही अफवांचं पेव फुटतंय. मात्र खोट्या गोष्टी पसरवू नये, असं आवाहन करतो. राज्यातील जनतेने संयम बाळगावा. सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल," अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
तसंच तेढ निर्माण करणारी विधानं कोणीही करु नये आणि कोणत्याही पक्ष नेतृत्त्वाने संयम बाळगला पाहिजे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. त्यांनी कधीही जातीयवादाला खतपाणी घातलं नाही. त्यामुळे जे लोक यांना मानतात, त्यांनी जातीयवाद पसरणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले
सणसवाडीत वाद, परिस्थिती नियंत्रणात
भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.
या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला. सोमवारी झालेल्या वादामध्ये एका तरुणाचा मृत्यूही झाला.
राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे.
सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, "भीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. तिथे जाऊन आपली भावना व्यक्त करतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा.
लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे."
"जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावं," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
सखोल चौकशी करा : रामदास आठवले
गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हजारो-लाखो कार्यकर्ते येतात. पण कधीही अनुचित प्रकार घडला नाही. पण ही पहिलीच वेळ आहे, काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे आहे. तसंच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी शांतात ठेवावी. शिवाजी महाराजांचे मावळे एकमेकांवर हल्ले करुन तुटून पडत आहेत, हे दृश्य कोणालाही न आवडणारं आहे.
संबंधित बातमी
पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात
सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार
पाहा व्हिडीओ