मुंबई : साकीनाका येथील भानू फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत 12 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. हा कारखाना अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारखान्याच्या मालकाला अटक केली असून आता पुढील तपास सुरु आहे.
खैरानी रोडवरील 'भानु फरसान' या मिठाईच्या दुकानाला पहाटे 4.30 च्या सुमारास ही आग लागली. आगीनंतर दुकानाच्या बाहेर झोपलेले कामगार पळून गेले, मात्र जे कामगार आत झोपले होते, ते आतच राहिले.
त्यातच आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आत अडकलेल्या कामगारांना बाहेर पडणं आणखी कठीण झालं. दुहेरी संकटात सापडलेल्या कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदरमरुन मृत्यू झाला.
दरम्यान, ''साकीनाका येथे झालेल्या आग दुर्घटनेसाठी जे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा अनधिकृत कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय का, हे तपासलं जाईल,'' अशी माहिती मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत गाजला
याच घटनेचा आधार घेऊन विधानसभेत काँग्रेस आमदार नसीम खान यांनी लोकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर शिवसेना-भाजपने नसीम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. ज्या कामकाजातून वगळ्यात आल्या.
नसीम खान यांनी मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला आणि विधानसभेत भूकंप झाला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलारांनी हा मुंबई तोडण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करत आक्षेप नोंदवला.