Sachin Waze NIA Investigation: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांबद्दल सचिन वाझे यांची चौकशी करण्यास देखील CBI ला परवानगी देण्यात आली आहे. NIA कस्टडीतच सीबीआय परमबीर सिंह यांच्या देशमुखांवरील आरोपांची वाझेंकडे चौकशी करणार आहे. वेळ सीबीआयनं एनआयएसोबत बोलून ठरवावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाचे निर्देश
तर या प्रकरणातील विनायक शिंदे आणि नरेश गोरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे एनआयए कोर्टाचे निर्देश दिले आहेत.
महत्वाचं म्हणजे मनसुख हिरण मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कटात सामील होता. त्यातूनच त्याचा जीव गेला असा दावा एनआयएनं कोर्टात केला आहे.
सचिन वाझे यांच्याकडून 36 लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक आहे. 'शेवटी यामागे काहीतरी मोठा आर्थिक हेतू हेता हे स्पष्ट आहे', मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक आहे, असं एनआयएनं म्हटलं आहे.
आज अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्याकांड प्रकरणात सचिन वाझेंसह विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना कोर्टात हजर केलं. विनायक शिंदे आणि नरेश गोरसाठी NIA नं न्यायालयीन कोठडी मागितली. विनायक शिंदे आणि नरेश गोरची चौकशी पूर्ण झाली असून आणखी कोठडीची गरज नसल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं.
या दरम्यान विनायक शिंदेनी केलेली विशिष्ट जेलसाठीची मागणी कोर्टानं फेटाळली. आरोपीला जेल निवडण्याचा अधिकार नाही, रोस्टरप्रमाणे ज्या जेलसाठी नाव लागेल तिथं पाठवलं जाईल असं न्या. प्रशांत सित्रे यांनी म्हटलं. तर दुसरीकडे सचिन वाझेंसाठी एनआयएनं चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली. UAPA नुसार 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची तपासयंत्रणेकडून एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला विनंती केली.