मुंबई : मुकेश अंबानी यांच्या 'अँटालिया' या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरण मृत्यू प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावा सचिन वाझे यांनी गुरुवारी एनआयए विशेष न्यायालयात केला. तसेच आपल्याला न्यायालयाला काही गोष्टी सांगायच्या असल्याचंही वाझे यांनी न्यायालयाला सांगतंलं. तेव्हा 'त्याबाबत तुम्ही आपली बाजू लेखी स्वरूपात मांडा', असे निर्देश देत न्यायालयाने वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. त्या गाडीचे मालक मनसूख हिरण यांच्या अनाचक मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली होती. गुरूवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आलं. तेव्हा, वाझे यांनी केलेला गुन्हा साधासुधा नसून देशपातळीवरील मोठा गुन्हा आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असणं ही शरमेची बाब असल्याचा दावा एनआयच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. तसेच वाझे यांना अटक केल्यापासून याप्रकरणातील तपासानं वेग पकडला आहे. वाझे यांच्यावर युएपीए कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या नुषंगानेही आमचा तपास सुरु असल्याचा युक्तिवाद सिंह यांनी केला. त्यामुळे प्रथमदर्शनी पुरावे आणि माहितीच्या आधारे वाझे यांना 15 दिवासांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणीही सिंह यांनी न्यायालयाकडे केली होती.
मात्र, वाझे यांच्याकडून या आरोपांवर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. फक्त जेलिटिन कांड्याच्या आधारावर वाझे यांच्यावर युएपीए कायद्यांर्तगत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यांचा हेतू देशातील ऐकता आणि संरक्षण भंग करण्याचा मुळीच नव्हता. त्यामुळे वाझे यांना युएपीए कायद्यांतर्गत कोठडी देता येणार नाही. तसेच केवळ जिलेटिनच्या कांड्या विस्फोटक मानता येत नाहीत. त्यासोबत डिटोनेटर असणं आवश्यक असतं, ज्या कुठेही सापडलेल्या नाहीत असा युक्तिवाद सचिन वाझेंच्यावतीने अॅड. आबाद पौंडा यांनी केला. तेव्हा, वाझे यांच्याकडे 62 बेकायदेशीर जिंवत काडतुस सापडली आहेत. त्याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता?, त्याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे. मोठ्या हॉटेलमध्ये जाताना वाझेंनी बोगस आधार कार्डचा वापर केला होता. जेलिटिन कांड्या असलेल्या गाडीचे गूढ अद्याप कायम आहे. तसेच तज्ज्ञांकडून आलेल्या अहवालात गाडीत स्फोटकं असल्याचं स्पष्ट म्हटलेलं आहे. अंबानी यांना देण्यात आलेल्या धमकी पत्राचीही चौकशी सुरू असल्यामुळे वाझे यांची युएपीए कायद्यांतर्गत चौकशी होणं गरजेचं असल्याचा दावा अनिल सिंह यांनी केला.
या सुनावणीदरम्यान सचिन वाझे यांनीही न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. "आपण सदर प्रकरणावर दीड दिवस तपास अधिकारी म्हणून काम केले आणि अचानक 13 मार्चला रात्री माझ्याविरोधात पुरावे आहेत, असे सांगून अटक करण्यात आली. या प्रकरणात जी चौकशी करायची होती ती झाली आहे, तेव्हा आता आणखीन पोलीस कोठडी देऊ नका. मी कुठल्याही गुन्ह्याची कबूली दिलेली नाही, असा दावा वाझेंनी एनआयए न्यायालयात केला.