मुंबई : 'सामना'च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचं काल (14 जून) रात्री निधन झालं. अल्पशा आजाराने अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


माधव पाटणकर हे उद्योजक होते. रश्मी ठाकरे यांचं माहेर डोंबिवली इथलं आहे.


दरम्यान रश्मी ठाकरे यांनी पितृशोक झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.


'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती, संजय राऊत नाराज असल्याची चर्चा


माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली," असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.





तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माधव पाटणकरण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटलं आहे की, "सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक 'सामना'च्या संपादक सौ.रश्मीताई ठाकरे यांचे वडील,उद्योजक श्री.माधवराव पाटणकर यांचं निधन झाल्याचं समजून दुःख झालं.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!पितृवियोगाचं दुःख सहन करण्याचं बळ सौ.रश्‍मीताईंना मिळो,ही प्रार्थना! मी, पवार कुटुंबीय तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत."