मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यास प्रवासी अनेकदा आंदोलनाचं हत्यार उपसतात. मात्र आता ही आंदोलनं करणं नोकरदारांना चांगलंच महागात पडू शकतं. मध्य रेल्वेकडून संबंधित प्रवाशांच्या बॉसला कारवाई करण्यास सांगितलं जाणार आहे. 'मुंबई मिरर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

गेल्या काही काळामध्ये रेलरोकोच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याला चाप लावण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. आंदोलक प्रवाशांविरोधात रेल्वे अॅक्टच्या कलम 153 अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहेच, मात्र संबंधित नोकरदारांच्या मालकांनाही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करण्यास रेल्वे सुचवणार आहे.

यापूर्वी रेल्वेरोको करणाऱ्यांना काही काळ ताब्यात घेतलं जायचं. त्यानंतर फक्त दोन हजारांचा दंड आकारुन त्यांची सुटका केली जायची. आंदोलक प्रवाशांचे सिझन पास रद्द करता येतील का, यावर मध्य रेल्वेने आर्थिक विभागाकडे मत मागवलं आहे.

2016 मध्ये प्रवाशांनी केलेल्या रेलरोकोच्या आठ घटना समोर आल्या होत्या. 2014 आणि 2015 मध्ये मात्र अशाप्रकारे प्रत्येकी एकच आंदोलन झालं होतं. नवीन वर्षाची सुरुवातही मध्य रेल्वेसाठी फार बरी झाली नाही, गेल्या आठवड्यातही दिवा स्थानकावर वाहतूक रेंगाळल्याने प्रवाशांचा संताप झाला होता.

प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या या निर्णयाचं स्वागतच केलं आहे. ही कठोर कारवाई करण्यात यावी, मात्र मध्य रेल्वेवरील दिरंगाई टाळली गेलीच पाहिजे, असं मत काही प्रवाशांनी व्यक्त केलं आहे.