मुंबई : मुंबईच्या नायगावमधील बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. शापुरजी पालनजी आणि एल अँड टी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे.
नायगावमधील बीडीडी चाळीतील सध्याच्या सदनिका 160 चौ. फुटांच्या आहेत. पुनर्विकासानंतर बीडीडी चाळीतील रहिवाशांना 500 चौ. फुटांच्या सदनिका देण्यात येणार असल्याची माहितीही रवींद्र वायकर यांनी दिली. दोन आठवड्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे.
दरम्यान नायगावमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचं रवींद्र वायकर यांनी सांगितलं आहे.
मुंबई विकास विभागामार्फत औद्योगिक कामगारांच्या निवासासाठी मुंबईतील वरळी, ना. म. जोशी, नायगाव आणि शिवडी परिसरात एकूण 93 एकर जागेवर 207 इमारती बांधण्यात आल्या आहेत. 1921 ते 25 या कालावधीत या इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळं या बीडीडी चाळींचं वयोमान तब्बल 90 वर्ष झाल्यानं त्या जर्जर झाल्या आहेत. त्यामुळं या बीडीडी चाळीचं पुनर्विकास करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती.