पक्षाची थेट बदनामी होत असल्यामुळे राम कदम यांचं प्रवक्तेपद काढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केवळ राम कदम यांना पक्षाकडून तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. राम कदम यांच्या वक्तव्याला 72 तास झाल्यानंतर भाजपने केवळ कारवाईचे संकेत दिले आहेत.
विधिमंडळाच्या नियमांनुसार राम कदम यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?
1) राम कदम यांच्या निलंबनाचा अशासकीय प्रस्ताव सभागृहात आणावा लागेल. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी मान्य केला तर तो सभागृहात बहुमताने सिद्ध करावा लागेल.
2) विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेचा साथ मिळाली तर राम कदम यांच्यावर कारवाई होऊ शकते.
भाजप - 122
रासप - 1
बहुजन विकास आघाडी - 3
अपक्ष - 7
-------
एकूण = 133
शिवसेना - 63
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी काँग्रेस - 41
शेकाप - 3
एमआयएम - 2
मनसे - 1
सपा - 1
भारिप - 1
माकप - 1
-------
एकूण = 155
3) सरकारकडून उच्चस्तरीय समिती गठित करुन शिक्षेच्या पुढील शिफारशी करण्यात येतील.
- विशेषाधिकार भंग,
- कारावासाची शिक्षा,
- निलंबन करणे
- सदस्यत्व कायमचे रद्द करणे
चौकशी पूर्ण करुन अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल.
राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले होते.
राम कदम यांचा माफीनामा
दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राम कदम यांनी लिहिलं आहे की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे."
महिला आयोगाकडून दखल
भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याची महिला आयोगाकडून स्वाधिकारे दखल घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करुन घेतली असून आठ दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत.
घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात बोलताना आमदार राम कदम यांनी महिलांविषयक बेताल वक्तव्य केलं होतं. वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांमधून त्याचं वार्तांकन झालं होतं. या पार्श्वभूमीवर कदम यांच्या या वक्तव्याची आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
महिलांविषयक वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यापूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने कदम यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.