Raju Shetti on Devendra Fadnavis: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज (15 मे) मुंबईत काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार करण्यात आला. या आंदोलनात शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक एकटवले. मात्र, मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना फरफटत नेत गाडीत कोंबले. राजू शेट्टी यांना फरफटत नेण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर यांच्यासह मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार यांनाही उचलून नेले. यंदा काजू आणि आंबा या दोन्ही फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.याचबरोबर केंद्र सरकारने साखर आणि कांद्यावर लादलेल्या निर्यातबंदीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाकडे जाणार होता. आंदोलकांनी निषेध म्हणून रस्त्यावर आंबे फेकून आपला संताप व्यक्त केला.
पोलिसांनी आंदोलकांना शिवालय बंगल्याजवळ रोखले आणि राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ, अर्जुन महादेव जाणकर, शेखर जयंत पाटील आणि विनायक राऊत यांसारख्या दिग्गज नेत्यांना ताब्यात घेतले.आंदोलकांवर बळाचा वापर आणि धक्काबुक्की झाली. या आंदोलनात शेतकरी संघटनांसोबतच शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही'
राजू शेट्टी यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, आम्ही शिवालयमध्ये जमलेलो होतो. तिथून अचानक पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही ताब्यात घेत आहोत. मी त्यांना विचारलं की जोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळापर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला ताब्यात घेण्याचा काही एक अधिकार नाही. तेव्हा त्यांनी उर्मट भाषा केली. बळाचा वापर करून, धक्काबुक्की करून, लाठीचार्ज करून अनेकांना जखमी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोलीस खाक्या दाखवला
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, गेल्या अडीच महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आंदोलन करत असताना मुख्यमंत्री चार-पाच वेळा कोकणात आले. कोणाच्या वाढदिवसाला आले, कोणाच्या लग्नाला आले आणि काही खासगी कामासाठी आले, पण अडीच महिन्यांत सातत्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय त्यांचं म्हणणं आहे? शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तपासलं असतं, पण साधं निवेदन घेण्याची सुद्धा त्यांनी तसदी घेतली नाही. कोकणातील शेतकरी 50 वर्षांत पहिल्यांदा मुंबईत आला होता. मुख्यमंत्र्यांनी पोलीस खाक्या दाखवला, याचा आम्ही धिक्कार करतो आणि याची किंमत निश्चितच मुख्यमंत्र्यांना चुकवावी लागेल, असा इशारा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
