मुंबई: वरळीतील मराठी अस्मिता मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवण्याची शक्यता निर्माण केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता-9) सायंकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीचे भाजपवर संभाव्य परिणाम
राज ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यात जरी थेट युतीची घोषणा केली नसली तरी उद्धव ठाकरेंबरोबर सहकार्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका ही केवळ महापालिका नसून, तिच्याकडे हजारो कोटींचे बजेट असल्याने ती महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटासाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
भाजपने या युतीच्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करवले असून, त्याचे निष्कर्ष अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना दिले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा पर्याय, तसेच तांत्रिक अडचणींच्या माध्यमातून वेळ घेण्याची चर्चा देखील झाल्याची चर्चा आहे.
अमित शहांचा सल्ला: वाद टाळा, एकसंधतेचा संदेश द्या
महापालिका निवडणुका होईपर्यंत कोणताही भाजप किंवा शिंदे गटाचा नेता वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असा स्पष्ट सल्ला अमित शहांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या अलीकडच्या कृती आणि वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले असून, भाजपनेही या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महायुतीमधील ‘एकसंधतेचा संदेश’ जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
त्रिभाषा सूत्रावरून नाराजी आणि राज ठाकरेंची भूमिका
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय रेटला होता. या निर्णयाला राज ठाकरेंनी प्रखर विरोध दर्शवला होता. याच मुद्यावरून शिंदे सरकारने राज ठाकरेंना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले, अशी माहिती अमित शहांनी शिंदेंकडून घेतली. त्रिभाषा सूत्र आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवरही भाजप नेतृत्व चिंतेत असल्याचे समजते.
युतीसाठी संभाव्य पर्यायांची चाचपणी
ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटाला कोणते नेते, पक्ष सोबत घेता येतील, याची चाचपणी सुरू झाली आहे. हिंदी भाषिक मतदारांचा कल, मराठी अस्मितेवर आधारित प्रचार, तसेच राजकीय संधींचा योग्य वापर या सगळ्यांचा सविस्तर आढावा शहांनी घेतला आहे.
मुंबईत अधिवेशन सुरु असताना शिंदेंनी दिल्ली गाठली
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्लीचा दौरा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांशी भेट घेतली. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना आणि अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जात असताना हा दिल्ली दौरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपले अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आणि त्याऐवजी उदय सामंत किंवा इतर नेत्यांना पाठवले होते. सुनील प्रभू यांच्यासह 50 नेत्यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.