नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळालं तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. तसंच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
सरकार जनतेला कोट्यवधींच्या योजनांचं आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, मात्र त्या भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही का? असा सवालही त्यांनी विचारला.
मराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय. मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. फक्त कोट्यवधींच्या घोषणा करत आहे. जनतेला त्यांच्या या घोषणांमधून आशा वाटते, ते टाळ्या वाजवतात. मात्र सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
नवी मुंबईतील कळंबोलीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं. मात्र या आंदोलनात परप्रांतिय चेहऱ्यांचा सहभाग होता. परप्रांतिय चेहऱ्यांमुळे आंदोलन बदनाम होऊ देऊ नका असं आवाहनंही राज ठाकरेंनी केलं आहे.
नोटाबंदीचा नोकरदारांना फटका
मोदी सरकारने सत्तेत आल्यावर जी नोटाबंदी केली, त्यामुळे 3 कोटी नोकरदारांना आपली नोकरी गमावावी लागली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मात्र योगा करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे
मराठा आरक्षणासाठी राज्यात जे आंदोलन झालं, त्या आंदोलनातील तरुणांवर 307 कलमांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. म्हणजे भविष्यात आरक्षण मिळालं तरीही त्यांना गुन्ह्यांमुळे नोकरीत संधी मिळणार नाही. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.
मराठा आंदोलकांवर गंभीर गुन्हे, त्यांना नोकऱ्या कोण देणार? राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2018 07:11 PM (IST)
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळालं तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -