मुंबई : मुंबईत येणारे लोंढे, मराठी पाट्यांचा मुद्दा, मशिदींवरील भोंगे, टोल नाक्यांवरील आंदोलने, वरळी बीडीडी चाळीचा मुद्दा आणि कोळी बांधवांना साद... असे एक ना अनेक मुद्दे मांडत राज ठाकरेंनी वरळीत आक्रमक भाषण केलं. पण त्या ठिकाणचे विद्यमान आमदार आणि त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एक चकार शब्दही काढला नाही हे विशेष. 


वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे रिंगणात आहेत. संदीप देशपांडेंचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आणि त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. त्यावेळी संपूर्ण भाषणात राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर टीका सोडा, चकार शब्दही काढला नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पण आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला नाही. 


आधी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे उभे असलेल्या माहीममध्ये सभा घेणार नसल्याचं जाहीर केलं. आता राज ठाकरेंनी वरळीमध्ये सभा तर घेतली पण पुतण्यावर बोलण्याचं टाळलं. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंनी घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे. 


उद्धव ठाकरे माहीममध्ये सभा घेणार नाहीत


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातल्या प्रचारसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि पुतणे आदित्य ठाकरेंवर बोलणं कटाक्षानं टाळलं. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनाही मुंबईतल्या माहीम मतदारसंघात प्रचारसभा घेणं तितकंसं आवश्यक वाटत नाही. माहीम मतदारसंघ हा आपल्या पक्षाचा बालेकिल्ला असल्यानं इथं सभा घेण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना तसं वाटणं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव तसेच उद्धव ठाकरेंचे पुतणे अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवतायत हा फक्त योगायोग आहे का, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे. 


अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन 


दरम्यान वरळीआधी घाटकोपरमध्ये राज यांनी सभा घेतली. यावेळी राज बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "राज्याची सत्ता एकदा आपल्या हातात द्या, अपयशी ठरलो तर माझं दुकान बंद करुन टाकेन." मनेसेनं आजपर्यंत अनेक आंदोलनं केली, ज्या ज्या गोष्टी केल्या त्या कायमस्वरुपी होत्या असा उल्लेख आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी केला. घाटकोपर पश्चिममध्ये मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा घेतली. 


शिवाजी पार्कवर शेवटची सभा कोण घेणार?


राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सांगता 17 नोव्हेंबरला होणार आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यादिवशी स्मृतिदिन आहे. त्यामुळे आपापल्या पक्षांच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी मुंबईतल्या शिवाजी पार्कचं मध्यवर्ती मैदान मिळावं यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळं शिवाजी पार्कवर प्रचाराची शेवटची तोफ उद्धव ठाकरेंची धडाडणार की राज ठाकरेंची याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.


ही बातमी वाचा: