मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मनसे नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ही नवी राजकीय समीकरणं जुळल्याची चर्चा आहे.


नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत कोकणात नारायण राणेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदावाराचा पराभव झाला.

मुंबई पदवीधर निवडणुकीत पुन्हा एकदा रंगत वाढणार आहे. शिवसेना विरुद्ध नारायण राणे ही लढत नवीन नाही. मात्र शिवसेनेच्या पराभवासाठी नारायण राणेंना आता राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मनसेकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी

कॅबिनेट मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता कट करत ते सध्या आमदार असलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना देण्यात आली आहे. विलास पोतनीस हे सध्या बोरीवलीचे विभाग प्रमुख आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम

नाशिक शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि कोकण विभागातून पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपत आहे. यासाठी 25 जून रोजी मतदान होईल, तर 28 जून रोजी निकाल आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार

नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे

मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील

मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत

कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे