मुंबई : बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते, ते कुणालाही समजले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर मला व्याख्यान द्यायला आवडेल असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. आज राज्यात, कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे शिसारी आली. बाळासाहेब आज नाहीत हे त्यामुळे बरंच झालं, नाहीतर त्यांना वेदना झाल्या असत्या असंही ते म्हणाले. यापुढे मराठीच्या मुद्द्यावर कायम लढत राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त षन्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले. त्यावेळी संजय राऊत आणि अमित ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनामध्ये मी एक लेखही लिहिला आहे. बाळासाहेबांना कसं पाहायचं, त्यांना कसं मांडायचं हा प्रश्न अनेकदा उभे राहतो. हिंदुहृदयसम्राट, व्यंगचिककार, राजकारणी असे अनेक पैलू आहेत. बाहेर अनेक काही घडायचं, पण बाळासाहेब व्यंगचित्र रेखाटताना त्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर उमटत नसायचा."

Raj Thackeray On Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीवर भाष्य

आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय की बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते? अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.  

Raj Thackeray On Balasaheb : मला पक्ष नाही घर सोडावं लागलं होतं

जुनी आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले की, "मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी पक्ष सोडणं हे माझ्यासाठी नव्हतं, ते घर सोडणं होतं. त्यानंतर मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या. झालं गेलं ते आता सोडून द्या एकदा."

एकदा बाळासाहेब ठाकरे या विषयावर मला एकदा व्याख्यान द्यायला आवडेल. त्या माणसाचे सगळे पैलू मला मांडायला आवडेल. हत्तीच्या गोष्टीप्रमाणे बाळासाहेब प्रत्येकाला वेगवेगळे वाटतात, पण जगाला ते कळलेच नाही असं राज ठाकरे म्हणाले. 

Raj Thackeray Mumbai Speech : प्रमोद महाजनांसोबतचा किस्सा

राज ठाकरेंनी यावेळी बाळासाहेब आणि प्रमोद महजानांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावेन असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यावर प्रमोद महाजन यांनी ते शक्य नसल्याचं सांगितलं. त्यावर 'मी तसं करायला लावेन' असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले. आज जे हिंदुत्वाच्या नावाने आरडाओरडा करतात त्यांना त्यावेळी ही कल्पनाही नव्हती. आज त्याच लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडलाय."