मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतरच युती संदर्भातल्या चर्चांना उधान आलं होतं. आता लवकरच राज ठाकरे देखील वर्षा बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे मनसे-भाजप आणि शिंदे गट यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांना वेग आला आहे.
गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र या सगळ्या भेटीगाठींमध्ये विशेष लक्षणीय भेट ठरली ती म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची. कारण यानंतरच राज्यात नवीन राजकीय गणित पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
खरंतर शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतांची पोकळी भाजप कशी भरणार हा सवाल उपस्थित होत होता. यासाठीच कदाचित मनसेला भाजप जवळ करू शकतो अशी देखील चर्चा होती. मात्र मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरच पाणी गेलं. राज्यांत शिंदे-फडणवीस सरकारं आलं आणि आता मनसे सोबतच्या युतीच्या चर्चा चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा मुंबई दौऱ्यावर असताना भाजपा नेत्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर झाली. यात मनसेसोबतच्या युतीच्या शक्यतांची पडताळणी देखील झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
सध्या सत्तेमध्ये भाजपसोबत शिंदे गट देखील आहे. यामध्ये शिंदे गटातील सहभागी आमदारांचा पालिका निवडणुकीत किती फायदा होईल याबाबत सांशता आहे. माञ जर सोबत मनसे असेल तर नक्कीच मराठी मतं आपलीशी करता येतील याची खात्री भाजप आणि शिंदे गटाला आहे. यामुळेच पुन्हा एकदा होणारी मुख्यमंत्री- राज ठाकरे भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता ही युती नक्की शिवसेनेसाठी अडचण ठरणार आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या तिघांची युती होईल आणि याचा थेट परिणाम शिवसेनेच्या मतांवर होईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :