मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाने निर्णयांचा (Cabinet Decision) धडाका सुरु केली आहे. मुंबईत (Mumbai) प्रवेश करणाऱ्या पाचही एन्ट्री पॉईंटवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर केली आहे. आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसात आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून, एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटने मुंबईत प्रवेश करणाऱ्या मुलुंड, ऐरोली, वाशी, दहीसर आणि आनंदनगर या टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे-नवी मुंबईतून येणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या टोलनाक्यावरुन वाहनचालकांना 45 ते 75 रुपये टोल द्यावा लागतो. दरम्यान, आजच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या लढ्याला यश आल्याचं म्हटलं आहे. शिवाय मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही मनसे आणि राज ठाकरे यांनी केलेल्या टोल आंदोलनामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं.
कॅबिनेट मंत्री शिवतीर्थवर, दादा भुसे-राज ठाकरेंच्या चर्चेची आठवण
राज्य सरकारने आज मुंबईतील टोलमाफीचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णय मनसे नेते हे राज ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या भेटीची आठवण करुन देत आहेत. दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर 2023 रोजी राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. राज ठाकरे यांनी टोलबाबत राज्य सरकारची भूमिका काय याबाबत सातत्याने विचारणा केली होती.
दादा भुसे आणि राज ठाकरेंच्या त्या बैठकीत नेमकं काय झालं होतं?
- दादा भुसे हे गेल्या वर्षी राज ठाकरे यांच्या घरी सकाळी 8 वाजता पोहोचले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत ठाण्यातील टोलनाक्यांवर वाढीव टोल (Toll Plaza Issue) एक महिन्यात रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
- तसेच प्रत्येक टोलनाक्यावर 200 ते 300 मीटरपर्यंत पिवळ्या रेषेवर रांग गेली, तर त्यापुढच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील.
- 4 मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही
- मुंबईतील सर्व एंट्री पॉईन्ट्सवर सरकारतर्फे कॅमेरे बसवण्यात येतील, असे निर्णय राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
मुंबईतील 5 एन्ट्री पॉईंटवर टोलमाफी
राज्य सरकारने आज 14 ऑक्टोबरला मुंबईतील 5 एन्ट्री पॉईंटवर हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली आहे. वाशी, मुलुंड, ऐरोली, आनंदनगर आणि दहीसर या टोलनाक्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, मुंबईतील टोलमाफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीव पडणार आहे. जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. राज्य सरकारला जवळपास 5 हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदारांना द्यावा लागणार आहे. पाच टोलपैकी चार टोलची मुदत 2027 पर्यंत आहे तर एक टोल 2029 पर्यंत आहे.
आणखी वाचा