MPSC Exam : 31 ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या होणाऱ्या एमपीएससी (MPSC) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. या परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आज 30 आणि उद्या 31 ऑक्टोबर रोजी प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.  परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले होते. याला रेल्वेनं मंजूरी दिली आहे.


MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची महत्वपूर्ण घोषणा


राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करणार असून त्यांना 30 व 31 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षा घेण्यासाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. 


एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असलेल्या व्यक्तिंना वैध तिकिटावर एका दिवसाकरीता प्रवास करण्याची मुभा द्यावी तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी, असं राज्य शासनानं म्हटलं होतं. सरकारच्या या मागणीला रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 


रेल्वे विभागाच्या परवानगीनंतर आता विद्यार्थ्यांना आज 30 आणि उद्या 31 तारखेला लोकलनं प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. त्यासाठी एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. ओळखपत्र दाखवल्यानंतरच विद्यार्थांना परीक्षेसाठी लोकलमधून प्रवास करता येणार आहे. परीक्षेत सहभागी होणारे विद्यार्थी, निरिक्षकांना आणि MPSC परीक्षा देण्यासाठी सहाय्यक कर्मचार्‍यांना वैध असलेल्या तिकीटासह लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकिटे जारी केली जाणार आहेत. याव्यतिरिक्त MS Innovative India Pvt.ltd चे कर्मचाऱ्यांना देखील प्रवास करण्याची परवानगी देखील दिली जाणार आहे.