मुंबई : गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून 229 कोटी रुपये खर्चून कुलाबा जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र आता या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह भाजप नेते आणि स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी विरोध केला आहे. तसेच माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी देखील जोरदार विरोध दर्शविला आहे. हा प्रकल्प कुलाबा येथे न करता समुद्राच्या इतर कोणत्याही भागात करा, अशी स्थानिकांची मागणी आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आता भाजपचे मंत्री आणि भाजपचे स्थानिक आमदार यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
या जेट्टी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यासाठी कुलाबा येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक काळ्या रंगाचे कपडे परिधान करून एकत्रित जमलेले पाहायला मिळाले. यावेळी आमदार राहुल नार्वेकर यांनी स्थानिकांना संबोधित केले आणि त्यांना आश्वासित केले. कुलाबा येथील नागरिक फक्त आंदोलनावर थांबणार नाही तर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकल्पाच्या विरोधात याचिका देखील दाखल करणार आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी खंत व्यक्त केली. हे प्रकल्प कुलाबा येथे होणार यासंदर्भात स्थानिक आमदार म्हणून मला कल्पना दिली गेली नाही. या प्रकल्पाला स्थानिकांचा जोरदार विरोध असून त्यांच्या या भूमिकेला माझा देखील पाठिंबा आहे. हे प्रकल्प कुलाबा येथे न करता इतर कोणत्या ठिकाणी करता येईल का या संदर्भात सध्या संबंधित मंत्री आणि प्रशासनासोबत बोलणी सुरू आहे असे राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
कुलाबा येथील स्थानिकांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून इथल्या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. इथल्या स्थानिकांनी म्हटले आहे की, हा संपूर्ण पट्टा मुंबईतील हेरिटेज वस्तू म्हणून ओळखला जातो. तिथे हे प्रकल्प कशाला? याआधी आम्ही देशाच्या भल्यासाठी नेवल डॉकला आधीच समुद्रातील जागा दिलेली आहे. पण ते देश हितासाठी होत. हा प्रकल्प अय्याशीसाठी आहे.
कोळी बांधवांच्या मते, जिथे हा प्रकल्प उभा करणार आहे तिथे मासे आहेत. कोळंबी बोंबिल असे मासे तिथे मिळतात. त्यामुळे कोळी बांधवांसाठी हा प्रकल्प धोकादायक आहे. जेट्टी बनविण्याआधी सरकारने कुलाब्यातील वाहतूक कोंडी सोडवावी असा मुद्दा स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.
स्थानिकांचा विरोध का?
- गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून 229 कोटी रुपये खर्चून कुलाबा जेट्टी आणि टर्मिनल प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडलं.
- हे काम सुरु करण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याचं स्थानिकांचं आणि स्थानिक आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे म्हणणे आहे.
- वाहतूक कोंडी आणि गर्दी यासारख्या स्थानिक समस्यांचा विचार न करता कुलाबा जेट्टी व्हीआयपींसाठी नियोजित करण्यात आली आहे असा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
- रहिवाशांनी हा प्रकल्प प्रिन्सेस डॉक येथे हलवण्याची मागणी केली आहे.
- स्थानिक आमदार, राहुल नार्वेकर आणि मंत्री राणे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, तात्पुरते या जेट्टीचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत.