मुंबईवर दु:खाचा डोंगर, राहुल गांधींकडून मराठीतून फुंकर
एबीपी माझा वेब टीम | 29 Dec 2017 04:11 PM (IST)
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत.
मुंबई : लोअर परेलमधील कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग लागली. यात मोठी जीवितहानी झाली. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकशीचीही मागणी केली. त्यांनी मराठीतून ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी काय म्हणाले? “मुंबईमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”, अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या. कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आग मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. काय आहे प्रकरण? हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पाहा बातमीचा व्हिडीओ :