मुंबई : मुस्लीम धर्मियांमध्ये 'हलाल' पद्धतीचा अवलंब करुन कत्तल केलेले मांसाहारी खाद्यपदार्थ सेवन केले जातात. असे पदार्थ सर्वच हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असतातच असे नाही. यामुळे 'हलाल' पद्धतीने कत्तल केलेले खाद्यपदार्थ हॉटेलमध्ये असल्याचे फलक लावले जावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


समाजवादी पक्षाच्या या मागणीला राजकीय व धार्मिक संस्थांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुस्लीम धर्मामध्ये एका विशिष्ट पद्धतीने प्राण्यांची कत्तल केली जाते, त्याला हलाल म्हटले जाते. हलाल पद्धतीने कत्तल केलेल्या प्राण्यांचे मासाचे सेवन करणे हे मुस्लीम धर्मियांना अनिवार्य आहे.


मात्र मुंबईमधील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 'हलाल' पद्धतीचा अवलंब करुन मांसाहारी खाद्यपदार्थ तयार केले आहेत किंवा नाही याची शंका मुस्लीम धर्मियांमध्ये असते.


त्यामुळे मुंबई महापालिकेच्या व राज्य सरकारच्या आस्थापनेवरील हॉटेल्समध्ये मांसाहारी खाद्यपदार्थ 'हलाल' पद्धतीचे आहेत किंवा नाही, याची माहिती देणारे फलक लावण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाकडून महापालिका आयुक्त तसेच अन्न व औषध द्रव्य प्रशासनाकडे केली गेली आहे.