पुणे : पोर्शे कार (Porsche car) अपघातातील अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह कुटुंबातील सर्वच सदस्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवालची जामिनावर (Court) सुटका झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांना मुंबई से आया मेरा दोस्त या गाण्यावर घरात जोरदार पार्टी केली. या पार्टीचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडीओत विशाल अग्रवाल आणि त्याची पत्नी पार्टीमध्ये नाचताना दिसत आहेत. या दोघांच्या गळ्यात कोऱ्याकरकरीत नोटांचे हार घातल्याचे दिसत आहे. विशाल अग्रवाल याच्या एका नातेवाईकाने त्याला उचलून घेतल्याचेही दिसत आहे. आपल्या मुलाच्या बेधुंदशाहीमुळे दोन निष्पापांचा जीव गेला होता, याचेही भान या कुटुंबाला राहिले नसल्याचंच दिसून आलं. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तर, अपघातात (Pune) जीव गमावलेल्या मृत अश्विनीच्या वडिलांनीही लोकांना कायद्याचा धाकच उरला नसल्याचं म्हटलं आहे.
''दोघांचा जीव घेऊन त्याचा आनंद साजरा करणे ही कदाचित त्यांच्या समाजातील प्रथा असावी. जामिनावरील सुटकेनंतर पार्टी करुन ते सर्वसामान्य नागरिकांची खिल्ली उडवत आहेत. कायदा सामान्य माणसालाच जखडून ठेवतो, हाच कायदा त्यांना शिक्षा टाळण्याची तरतुदी देतो की, जर एखादा अल्पवयीन असेल तर तो काहीही करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल द्यायला हवा ज्यामुळे लोकांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल'', असे म्हणत पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अश्विनीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. आता, आरोपींना कायद्याची भीतीच उरलेली नाही. एखाद्याला उच्च न्यायालयाने शिक्षा दिली तरी सर्वोच्च न्यायालयातून त्याची सुटका होते. त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते. मुस्लिम देशांप्रमाणे ‘रक्ताच्या बदल्यात रक्त’ असे कठोर कायदे भारतात लागू होईपर्यंत काहीही सुधारणा होणार नाही, अशा शब्दात आपल्या भावना सुरेश कोष्टा यांनी व्यक्त केल्या आहेत.
विशाल अग्रवालचा जामीन रद्द करा - कोष्टा
कायदा कठोर नसेल तर यावर नियंत्रण कसे येणार, लोकांमध्ये संदेश कसा जाणार?... त्याचा जामीन रद्द केला पाहिजे आणि त्याच्या आई-वडिलांना तुरुंगात टाकले पाहिजे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तरी त्यांना जामीन देऊ नये”, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
काय आहे प्रकरण
पुण्यात मे 2024 मध्ये घडलेल्या पोर्शे अपघात प्रकरणात दोन तरुणांचा जीव गेला होता. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर पुरवण्याइतप विशेष वागणूक दिली होती. तसेच या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलले होते. धनिकपुत्राचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी आपल्या ड्रायव्हरला धमकावण्यापासून ते पैसे दाबण्यापर्यंत शक्य ते सर्व प्रयत्न करुन पाहिले. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले होते. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तेव्हापासून विशाल अग्रवाल तुरुंगात होता. त्यावेळी विशाल अग्रवाल यांचा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला तुरुंगातून सोडण्यात आले होते. यानंतर आता विशाल अग्रवाल हादेखील तुरुंगातून बाहेर आला आहे.
