दिवा स्थानकात रेल्वे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांचं आंदोलन
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 11 Jan 2017 09:27 PM (IST)
दिवा (मुंबई) : मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं. दिवा–रोहा पॅसेंजर उशिराने आल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन सुरु केलं होतं. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांना रुळावरुन हटवण्यात आले. दिवा-रोहा गाडी दररोज उशिराने धावते. तीन तासांचा प्रवास असणाऱ्या गाडीत शौचालयाची देखिल सुविधा नाही. अशा परिस्थित गाडी उशिराने असल्यास आणखी गैरसोय होते, असा आरोप आंदोलक प्रवाशांचा आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रुळावर उतरून अर्धा तास लोकल ट्रेन रोखून धरली होती. अखेर आरपीएफने हस्तक्षेप करून आंदोलकांना हटवले. संतप्त प्रवाशांनी कल्याण गाडी थांबवली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला हटवलं आणि कल्याण गाडीचा मार्ग मोकळा केला. कल्याण गाडी पुढे निघाली. याआधीही दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या होत्या.