अंबरनाथ: ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये मुंबई महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड उभं राहणार आहे. मुंबईच्या कचऱ्यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंड कमी पडू लागल्यानं मुंबई महापालिकेनं अंबरनाथ तालुक्यात 100 एकर सरकारी जागा घेतली आहे. यासाठी महसूल विभागाला 10 कोटी रुपयांचा महसूलही मिळाला आहे, मात्र या जागेवर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिलाय. त्यामुळे येत्या काळात यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

निसर्गसौंदर्याने ओतप्रोत अशा अंबरनाथ तालुक्यातल्या करवले डम्पिंग ग्राउंडवरुन आता संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.  मुंबई महापालिकेनं या गावाशेजारची 100 एकर जागा डम्पिंग ग्राऊंडसाठी घेतली आहे. यासाठी महसूल विभागाला 10 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मुंबईच्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर उरलेली राख आणि इतर वेस्ट या जागेत टाकण्यात येणार आहे. मात्र याला इथल्या स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. मात्र हा विरोध मावळेल, अशी आशा प्रशासनाला असून त्यासाठी सध्या बैठकाही सुरू आहेत.

करवले गावाशेजारी असलेल्या कातकरी पाड्यात 79 आदिवासी कुटूंब वास्तव्याला आहेत. 550 लोकसंख्या असलेल्या या पाड्यात शाळा, मंदिरं, तबेले आणि आदिवासींची कौलारू घरं आहेत. मात्र डम्पिंग ग्राउंडसाठी मुंबई महापालिकेनं घेतलेल्या जागेत या आदिवासी पाड्याचाही समावेश आहे. त्यामुळे आता या आदिवासी बांधवांच्या स्थलांतराची तयारी मुंबई महापालिकेनं दाखवली आहे. आदिवासी बांधवांनी मात्र हे गाव सोडायला नकार दिला आहे. काहीही झालं तरी चालेल, पण आम्ही हे गाव सोडणार नाही, आणि डम्पिंगसाठी जागा देणार नाही, अशी भूमिका इथल्या आदिवासी बांधवांनी घेतली आहे.