मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा एकदा महागड्या नवीन गाड्या खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या 'स्कॉर्पिओ एन' गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नसल्याची तक्रार करत, आता त्यांच्या जागी महागड्या 'इनोव्हा क्रिस्टा' गाड्या देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे. हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
BMC Mumbai: 'स्कॉर्पिओ सोयीची नाही'; सभागृह नेत्यांची तक्रार
महापालिकेत नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना प्रशासनाकडून वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची 'इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड' गाडी देण्यात आली आहे. तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी 'स्कॉर्पिओ एन' वाहने देण्यात आली आहेत. मात्र, देण्यात आलेली 'स्कॉर्पिओ एन' ही गाडी प्रवासासाठी सोयीची वाटत नसल्याची थेट तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. त्यामुळे आता सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी पुन्हा नव्या 'इनोव्हा क्रिस्टा' गाड्या खरेदी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
BMC Mumbai: नेमक्या या गाड्या केव्हा खरेदी केल्या कोणासाठी आणि किती खरेदी केल्या?
मुंबई महापालिकेने महापौर उपमहापौर त्यासोबतच विरोधी पक्षनेत्या सभागृहनेते त्यासोबत विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी महापालिका महापौर निवडणूक होण्याआधी फेब्रुवारी महिन्यात तेरा गाड्यांची खरेदी केली होती... ही प्रक्रिया प्रशासकीय राजवट असताना पार पडली. ज्यामध्ये महापौरांसाठी एक इनोवा हाय क्रॉस हायब्रीड गाडी व इतर उपमहापौर सभागृह नेते विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी १२ स्कॉर्पिओ एन गाड्यांची खरेदी करण्यात आली. इनोव्हा'ची किंमत ३० लाख रुपये, तर एका स्कॉर्पिओची किंमत १८ लाख रुपये आहे, असा एकूण दोन कोटी १६ लाख रुपये खर्च या वाहनांवर करण्यात आला. महापालिका निवडणूक होण्याआधी मागील पावणे चार वर्षांमध्ये नगरसेवक आणि महापौर व विविध समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाने केला होता.. त्यामुळे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांसह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी वाहने खरेदीची प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाने पार पाडली होती
BMC Mumbai: ६ महिन्यांपूर्वीच केला होता २ कोटी १६ लाखांचा खर्च!
विशेष म्हणजे, महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना निवडणूक होण्यापूर्वी म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पदाधिकाऱ्यांसाठी १३ नवीन वाहनांची खरेदी केली होती.
महापौरांसाठी: १ इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड (किंमत: रु. ३० ते ३५ लाख)
इतर पदाधिकाऱ्यांसाठी: १२ स्कॉर्पिओ एन गाड्या (प्रति गाडी किंमत: १८ लाख रुपये)
या १३ वाहनांवर महापालिकेने तब्बल २ कोटी १६ लाख रुपये खर्च केले होते. महापालिकेत गेल्या पावणेचार वर्षांपासून नगरसेवक आणि अध्यक्ष नसल्यामुळे पूर्वीची वाहने अधिकारी वापरत होते. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर महापालिकेत नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ वाढल्याने पदाधिकाऱ्यांसाठी ही नवी वाहने खरेदी करण्यात आली होती.
BMC Mumbai: जनतेच्या पैशांची उधळपट्टी?
अवघ्या ६ महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या 'स्कॉर्पिओ एन' गाड्या बाजूला सारून पुन्हा महागड्या 'इनोव्हा क्रिस्टा' गाड्यांची मागणी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा नव्या गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला जात असल्याने महापालिकेच्या या उधळपट्टीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
BMC Mumbai: याप्रकरणी किशोरी पेडणेकांचा संताप
या प्रकरणी बोलताना माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मी यावरून दोन तीन गोष्टीवर प्रकाश टाकेन. यामध्ये 54 गाड्या घेतल्या. काही गाड्या वार्ड अध्यक्ष यांना दिल्या. आयुक्त यांना देखील गाड्या यातील दिल्या आहेत. आम्हाला ज्या गाड्या दिल्या तीच एव्हरेज 7-8 आहे. गाडी बरोबर नाही, पाठ दुखते असं काहीजण म्हणतायत. गाडी मुंबईच्या बाहेर न्यायची असते तेव्हा आयुक्त यांची परवानगी लागते. मी महापौर असताना दोन वेळा गाडी बाहेर घेऊन गेली होती, आताही मी बाहेर गाडी घेऊन जात नाही. अशा पद्धतीने पालिकेची लूटमार करत असतील तर योग्य नाही. आयुक्त हे काय यांचे लाड पुरवायला बसले आहेत का? महापौर यांची प्रायव्हेट सेक्रेटरी यांना 50 हजार दिले जात आहेत, नगरसेवकांना मात्र 25 हजार मानधन दिल जातंय. हे काम करताना आम्हाला विश्वासात देखील घेतलं जात नाही. प्रस्तावाबाबत पुढे वरवर बोललं जातंय, चुकीच्या प्रश्नावर आमचं नाव पूढे घेतलं जातंय. आपण या गाड्या पाच वर्ष वापरूया ना. ही मला गाडी आरामदायी वाटते आहे, स्कॉर्पिओचं नाव घेऊन त्याचं मार्केट बदनाम करण्याचं काम करतायत का? इलेक्शन व्हायच्या अगोदर या गाड्या खरेदी केल्या होत्या. स्कॉर्पिओ कंपनीला डाउन करायच असेल. प्रसिद्धीसाठी तीन महिन्याला 10 लाख, खाजगी PA ला 50 हजार महिन्याला दिले जातायत. यांच नक्की काम कसलं चाललंय. जे अगोदर महापौर काम करायचे ते आताचे महापौर करतायत पण मानधन एवढं? मी महापौर असताना माझ्या माणसांना असा पगार देत नव्हतो, आवड आणि शिकायला मिळायचं म्हणून माझ्या सोबत माणसं असायची असंही पुढे किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.
