मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन म्हटलं की अनेक विषय, चर्चा आणि आंदोलनाची चर्चा होत असते. अनेक आमदार वेगवेगळ्या विषयावरून चर्चेत असतात. पण आठ महिन्याच्या गर्भवती असतानाही सभागृहात येऊन ही कामकाजात सहभागी होणाऱ्या नमिता मुंदडा यावेळी चर्चेचा विषय झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पहिल्याच महिला आमदार आहेत ज्या गरोदर असताना कामकाजात सहभागी होत आहेत. लवकरच प्रसूती असल्यामुळे आणि त्या आधीचं हे महत्वाचं अधिवेशन असल्यामुळे या अवस्थेत ही सभागृहात कामकाजात सहभागी होत असल्यानं त्यांचं कौतुक देखील होत आहे.

अधिवेशनात त्या केवळ उपस्थिती दर्शवत नाहीत तर आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न उपस्थित करतात. अधिवेशनात सतत बसताना त्रास होतो. त्यामुळं थोड्या वेळ बाहेर लॉबीमध्ये येऊन चालतात. जेवण्याच्या अनियमित वेळा असल्या तरी नमिता मुंदडा काम करत आहेत. त्यामुळं त्या विशेष चर्चेत आल्या आहेत.

एबीपी माझाशी बोलताना नमिता मुंदडा म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात प्रचारात पहिले तीन महिने त्रास झाला. लवकरच प्रसूती आहे आणि त्या आधीचं हे महत्वाचं अधिवेशन असल्यामुळे उपस्थित होणं आवश्यक आहे. इथं सभागृहात अनेक आमदार काळजी घेतात. सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

 राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपत प्रवेश केला : नमिता मुंदडा


त्या म्हणाल्या की, सभागृहात महिला अत्याचार सारखे प्रश्न आले की त्रास होतो आणि मनावर काहीसा परिणाम देखील होतो. आपल्या बाळावर वेगळे गर्भसंस्कार होत आहेत असं हसत हसत नमिता मुंदडा यांनी सांगितलं. मतदारसंघातील जनता देखील सांगते ताई आता आराम करा, काम करू नका. पण पुढील अधिवेशन येता येणार नाही म्हणूज हे अधिवेशन पूर्ण उपस्थित राहायचं. काम करायचं हा निर्धार त्यांनी केला आहे.


नमिता मुंदडा यांनी सभागृहात उशी मिळावी म्हणून अध्यक्षांकडून परवानगी घेतली. तसंच सभागृहात पाणी पिता येत नाही त्यामुळं त्या बाहेर येऊन पाणी पितात. या स्थितीत देखील त्यांच्या उपस्थित राहण्याचे कौतुक होत आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, केजच्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपमध्ये


विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये ऐनवेळी प्रवेश केला होता.  त्या केज मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आल्या. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपत प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 2014 च्या निवडणुकीत  नमिता मुंदडा यांचा भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्याकडून पराभव झाला होता.