कल्याण : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच कोरोनाच्या विषयावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु असताना डोंबिवलीतील राजकारणी मात्र त्याला अपवाद ठरल्याचं दिसून आलं. सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली नगरीने हे नकारात्मक चित्र खोडून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 'डोंबिवली सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्रां'तर्गत डोंबिवलीतील सर्व राजकारणी एकत्र आले असून त्यांनी महापालिकेच्या कोविडविरोधी लढ्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यामध्ये कोरोनावरून प्रमुख पक्षांमध्ये मोठे राजकारण सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या कठीण प्रसंगात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच चित्र दिसत आहे. डोंबिवलीतही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. डोबिंवलीतील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन डोंबिवलीतील शिवसेनेचे नेते सदानंद थरवळ यांनी इतर पक्षीय नेत्यांना एकत्र येण्याची साद घातली. इतर पक्षीय नेत्यांनीही आपापले वाद, हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवून या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
सदानंद थरवळ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदू मालवणकर, मनसेचे प्रकाश माने, भाजपचे नंदू परब आणि आरपीआयचे किशोर तांबे यांनी एकत्रित येत सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. सध्या कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ सुरु आहे. बेड कुठे मिळेल, इंजेक्शन कुठे मिळेल? प्लाझ्मा कुठे मिळेल? अॅम्ब्युलन्स कुठे मिळेल? कोविड टेस्ट कुठे करायची? लसीकरण कुठे सुरु आहे? यांसारख्या असंख्य प्रश्नांनी डोंबिवलीकर सध्या हैराण झाले आहेत. याबाबत नेमकी कुठे माहिती मिळेल याचीच अनेकांना माहिती नसल्याने या डोंबिवली सर्वपक्षीय कोविड मदत केंद्राची स्थापना करणार असल्याचं सदानंद थरवळ यांनी सांगितले. या केंद्रांतर्गत सुरु होणाऱ्या वॉर रूममध्ये डोंबिवलीकरांना आवश्यक असणारी सर्व महत्वपूर्ण माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही थरवळ म्हणाले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या एकत्रित राजकीय पुढाकाराचे स्वागत आणि कौतुकही केले आहे. आमची आज सकारात्मक चर्चा झाली असून महापालिका प्रशासनाने या सर्वांची मदत घेण्याचे निश्चित केल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :