कल्याण : टिटवाळ्यात एका बेवारस मृतदेहाचा शोध लावताना पोलिसांनी चक्क कोंबडीच्या पिसांवरुन मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा आणि टिटवाळा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राया पुलाजवळ 23 जून रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असताना कोंबडीच्या पिसांमुळे पोलिसांनी थेट महिलेच्या मारेकऱ्यालाच अटक केली. या महिलेचा मृतदेह एका गोणीत भरुन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गोणीला कोंबडीची पिसं लागलेली असल्यानं मारेकरी हा चिकन शॉपमध्ये काम करणारा असावा असा कयास पोलिसांनी बांधला आणि तपासाची चक्र फिरवली.

टिटवाळ्याच्या बनेली परिसरातला चिकन विक्रेता आलम शेख हा गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय मृत महिलेसारख्या वर्णनाच्या एका महिलेची त्याच्या घरी ये जा असल्याचं समजल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मग काढत थेट पश्चिम बंगाल गाठलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी मृत महिला मोनी याच्याशी त्याचे अनैतिक संबंध होते आणि मोनी त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्यानं त्यानं एका मित्राच्या साहाय्याने मोनीचा गळा आवळून खून केला आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबूली आलम याने दिली.

ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा आणि टिटवाळा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं मोठं कौतुक होतं आहे.