पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावर पोहोचणार आहेत. अरबी समुद्रातील 16 हेक्टर आकाराच्या खडकावर शिवस्मारक साकारण्यात येणार आहे. या स्मारकाला एकूण 3600 कोटी इतका खर्च येणार आहे. स्मारकासोबत शिवकालीन इतिहास आणि अनेक अद्यायावत सुविधा याठिकाणी असणार आहेत.
VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!
उद्धव ठाकरेंची शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला हजेरी
शिवस्मारकासाठी मुंबईत निघालेल्या कलशायात्रेकडे शिवसेनेच्या नेत्यांनी सपशेल पाठ फिरवली. मात्र अस असलं तरी आज होणाऱ्या शिवस्मारक भूमिपूजनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. मातोश्रीवर शिवसेना आमदार आणि विभाग प्रमुखांची बैठक झाली. त्या बैठकीत शिवस्मारक भूमिपूजनावर चर्चा झाल्याचं समजतं.
कलशयात्रेच्या निमित्ताने भाजपचं शक्तीप्रदर्शन
अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने भाजपने मुंबईत काल जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करुन 36 जिल्ह्यातून आलेल्या जल-माती कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेले शिवप्रेमी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालबाग, परळ अशा मुख्य रस्त्याने ही मिरवणूक आधी भाजप कार्यालयाकडून गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाली. गेट वे ऑफ इंडिया इथे झालेल्या कार्यक्रमात जल आणि मातीचे कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले.
मित्रपक्ष भाजपवर नाराज
शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप करत मित्रपक्षांच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. कलशांची शोभायात्रा म्हणजे वर्चस्वाची लढाई बनली आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सुरु असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला आहे. तर जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी भाजप कुठे गेली होती?, असा सवाल खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.
कसं असेल समुद्रातील शिवस्मारक?
अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खडकावर शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या आहेत.
शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यादृष्टीने भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने सरकारच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
16 एकर जमीन
शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.
स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे.
स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी 325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.
काम दोन टप्प्यात
शिवस्मारकाचं काम दोन टप्प्यात केलं जाणार आहे. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यापूर्वी विनायक मेटेंनी दिली होती. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या पुळ्याचा समावेश असेल. तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, म्युझियम, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल.
संबंधित बातम्या
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!
शिवस्मारक: जल-माती कलशाची भव्य शोभायात्रा
शिवमय नव्हे भाजपमय, शिवस्मारकाच्या कलशयात्रेवर मेटे नाराज
‘शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा’ शिवसेनेची पोस्टरबाजी
मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन
अरबी समुद्रातील शिवस्मारक कसं असेल?