Mumbai Local News: मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.  ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. यावेळी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  कार्यक्रमस्थळी येण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला. 


या मार्गिकांमुळे चार फायदे
या नव्या मार्गिका मुंबईच्या कधीही न थांबणाऱ्या लाईफलाईनला अधिक गती देतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते म्हणाले की, "या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे चार फायदे होणार आहेत. लोकल आणि एक्प्रेससाठी वेगवेगळ्या लाईन होतील, इतर राज्यांतून येणाऱ्या गाड्यांना थांबावं लागणार नाही, कल्याण ते कुर्ला दरम्यान वाहतूक सुविधा वाढतील आणि मेगा ब्लॉकमुळे रविवारी होणाऱ्या असुविधेमध्ये कमी येईल."आत्मनिर्भर भारता'मध्ये मुंबईचे योगदान वाढावे यासाठी या शहरात अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


 





पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना 36 अधिकच्या लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. यातील 34 फेऱ्या वातानुकूलित असतील आणि दोन फेऱ्या सध्या लोकलच्या असतील. वातानुकूलित फेऱ्या सुरू करण्यासाठी एक एसी लोकल सजवण्यात आली होती. 


पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा फायदा काय? 
आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका झाली आहे. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचं काम गेली दहा वर्षे रखडलं होतं. मार्च 2019 अंतिम मुदत असतानाही त्यात अनेक वेळा बदल झाला होता. त्यानंतर जून 2021 ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. पण कोरोना आणि परिणामी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कमी मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला. त्यामुळे आता मार्च 2022 च्या आधी ही मार्गिका पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.


ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच 6 फेब्रुवारीपासून ही मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत मिळेल, असं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितलं आहे. 


संबंधित बातम्या: