मुंबई : 'प्लॅस्टिकचा वापर टाळा' किंवा 'प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा'असं नुसतं आपण ऐकतो. मात्र, हे कृतीत येत नाही. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणं मुंबईतील कांदिवली भागातील ठाकूर व्हिलेजच्या नागरिकांनी प्रत्यक्षात आणलं आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून ठाकूर व्हिलेज पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त होणार आहे.
मुंबईत 7000 हजार मेट्रिक टन कचरा रोज बाहेर पडतो. यामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे ठाकूर व्हिलेजच्या रेसिडेंट फोरम या ग्रुपने स्वतः पुढाकार घेऊन प्लॅस्टिकमुक्त मोहिम राबवायचं ठरवलं.
ग्रुपमधील सर्व सदस्यांनी स्वतः दीड लाख रुपये जमा करून प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या तयार केल्या, जनजागृतीसाठी टी-शर्ट, स्कीट, पोस्टर तयार केले आणि ठाकूर व्हिलेजमधील सर्व सोसायटीमध्ये जाऊन जनजागृती अभियान सुरु केलं. यामध्ये 10 ते 15 हजार नागरिक आणि 700 फेरीवाल्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
मुंबईतील 29 ऑगस्टच्या पावसामुळे पुन्हा एकदा प्लॅस्टिकचा मुद्दा समोर आला. प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याचं समोर आलं. त्यामुळे प्लॅस्टिकला कसं हद्दपार करता येईल, यासाठी अशाप्रकारची मोहीम या ग्रुपने सुरु केली. यामध्ये त्यांनी फेरीवाले, दुकानदार, भाजीवाले या सर्वांनाच कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह केला.
या ग्रुपने स्वतः 3 ते 4 हजार कापडी पिशव्या आतापर्यंत बाजारात वाटल्या. यासाठी भाजीवाले, दुकानदारसुद्धा ग्राहकांना कापडी पिशव्या घ्या, असं आवर्जून सांगत आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही प्लॅस्टिकबंदीविषयी अनेकदा बोलून दाखवलं आहे. मात्र हे ठाकूर व्हिलेजने प्रत्यक्षात उतरवलं आहे.