मुंबई : मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) काही दिवसांपूर्वी अचानकपणे पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीला (Senate Election) स्थगिती दिली होती. या निर्णयावर विद्यार्थी-युवक संघटनांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना आता स्थगितीचा वाद हा कोर्टात पोहचला आहे. मुंबई हायकोर्टात विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.  


सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याची कृती बेकायदेशीर असल्याचे याचिकाकर्ते अॅड. सागर देवरे यांनी म्हटले. 


मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या 10 जागांसाठीची निवडणूक 9 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. 10 सप्टेंबर रोजी होणारी ही प्रस्तावित निवडणूक अचानकपणे राजकीय दबावापोटी 17 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाने स्थगित केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
जाहीर झालेली निवडणूक स्थगित करण्याची मुंबई विद्यापीठाची कृती बेकायदेशीर असून सदर निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले असल्याचे अॅड. देवरे यांनी म्हटले. 


महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या निवडणूका 'एकरूप परिनियम 2017' आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतूदी नुसारच घेतल्या पाहिजे, तसेच एकदा जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम स्थगित करता येत नाही असा नियम असताना देखील राजकिय दबावापोटी मुंबई विद्यापीठाने निवडणूक रद्द केली असल्याचा मुद्दा त्यांनी याचिकेत उपस्थित केला आहे. 
त्यामुळे मुंबई विद्यापीठाची ही कृती बेकायदेशीर असून मुंबई विद्यापीठाने निवडणूक स्थगित करण्यासंदर्भात 17 ऑगस्ट रोजी जाहीर केलेले परिपत्रक रद्द करून निवडणूक वेळेतच पूर्ण करण्यात यावी या संदर्भात आदेश द्यावे अशी विनंती ॲड सागर देवरे यांनी याचिकेद्वारे अॅड. सागर देवरे यांनी केली आहे.


निवडणुकीला स्थगिती का? 


सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. त्यानंतर उच्च शिक्षण खात्याने मुंबई विद्यापीठाला पत्र लिहून निवडणूक स्थगित करण्याची सूचना केली होती.


असा होता निवडणुकीचा कार्यक्रम 


ही निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार होता.