मुंबई: राज्यभर गाजलेल्या बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याची मुंबई पोलिसांना परवानगी मिळाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात तपास करण्याकरिता नवाब मलिक यांची चौकशीची परवानगी मिळण्याकरिता मुंबई पोलिसांनी कोर्टात विनंती अर्ज केला होता. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग करत गोपनीय अहवाल लीक केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. 


न्यायालयाने याला परवानगी दिल्यानंतर आता मुंबई पोलिसांची सायबर सेलला शाखा या प्रकरणी नवाब मलिकांचा जबाब नोंदवणार आहे.  नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉंड्रिंग  गैरव्यवहार प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र न्यायालयाच्या परवानगीने नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.


मुंबई पोलिसाचा 700 पानी अहवाल दाखल
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी 700 पानी अहवाल दाखल करण्यात आला आहे.  मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये 20 शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जबाब  नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये एका अंमलदाराचा समावेश असून तो अंमलदार 2019 मध्ये राज्य गुप्तचर विभागात कार्यरत होता. या अंमलदाराने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, संजय राऊत साहेब म्हणून कोणाशी बोलायचं यावर खास लक्ष देण्याचा आदेश होता. याचा रिपोर्ट हा वरिष्ठांना द्यावा लागायचा. फोन टॅपिंग करणाऱ्या या टीममध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांसह 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे फोन टॅपिंग प्रकरण वैध्य आहे की अवैध्य हे माहित नसल्याचं या अंमलदाराने सांगितलं आहे.


संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी 16 मार्च 2022 रोजी रश्मी शुल्का यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तब्बल दोन तास त्या कुलाबा पोलीस ठाण्यात होत्या. रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.