पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी अण्णा हजारेंना साक्षीदार करण्याची मागणी
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 14 Jun 2018 10:19 PM (IST)
अण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण असून यातून काहीतरी नवी माहिती मिळू शकते, असा दावा आनंदीदेवी निंबाळकर यांनी या याचिकेत केला आहे.
मुंबई : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करण्यात यावे, अशी मागणी करत निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण असून यातून काहीतरी नवी माहिती मिळू शकते, असा दावा आनंदीदेवी निंबाळकर यांनी या याचिकेत केला आहे. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी याप्रकरणील आरोपींचा जबाब पुढील सुनावणीपर्यंत नोंदवू नये, असे आदेश सत्र न्यायालयाला दिले असून दोन आठवड्यांकरिता याबाबतची सुनावणी तहकूब केली. काय आहे प्रकरण? राजकीय वैमानस्यातून काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 2006 साली नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सात जणांना अटक केली होती. पद्मसिंह पाटील हे सध्या जामिनावर बाहेर असून या प्रकरणी सत्र न्यायालयात खटलाही अद्याप सुरु आहे. या हत्येमागे नेमके प्रमुख कारण काय असू शकते याचा उलगडा अण्णा हजारे करू शकतात, असा दावा सीबीआयनेही केला आहे.