मुंबई : बकरी ईदनिमित्त ऑनलाईन परवाने देताना उडालेल्या गोंधळानंतर आता एका व्यक्तीला एकाच बकऱ्याची कुर्बानी देण्याचा परवाना मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. तसेच कत्तलीनंतर उरलेले अवशेष गटारात टाकले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्यात येईल, अशी कबूली पालिकेच्यावतीनं सोमवारी हायकोर्टात देण्यात आली. मात्र होयकोर्टानं मंगळवारपर्यंत यावर आपला निर्णय राखून ठेवला आहे.

बकरी ईद हा सण तोंडावर आला असून पालिकेची अडचण होण्यासाठी संबधितांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. असा आरोप पालिकेच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

बकरी ईदनिमीत्त देवनार कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई महापालिकेने खाटीकांना ऑनलाईन परवाने देण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महापालिकेच्या याच जाहिरातींना ‘जीव मैत्री ट्रस्ट’ने हायकोर्टात आव्हान दिले असून कत्तलखान्याबाहेर परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.

कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांच्या कुर्बानीला परवानगी दिल्यास रस्ते, सार्वजनिक सोसायटी तसेच पदपथावरही बकऱ्यांची कत्तल केली जाईल. कत्तलखान्याबाहेर अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रक्त मिश्रीत दूषित पाण्यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच ऑनलाईन परवाने देताना पालिकेनं काय गोंधळ घातलाय हेदेखील याचिकाकर्त्यांनी पुराव्यानिशी हायकोर्टात सिद्ध केलंय.