अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलचे पेंटाग्राफ तुटल्यामुळे ठप्प झालेली मध्य रेल्वे पुन्हा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेनंतर अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दीही झाली होती.


अंबरनाथ रेल्वे स्थानकात दुपारी 2.56 वाजता येणारी कर्जत-सीएसएमटी फास्ट लोकल रेल्वे स्थानकात शिरताच ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघडामुळे या लोकलचे पेंटोग्राफ तुटले. यामुळे अप लाईनचा वीजपुरवठा तातडीनं खंडित करण्यात आला. त्यामुळे ही लोकल अंबरनाथ स्थानकात रखडली होती. कर्जतहून कल्याणकडे जाणारी रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

कल्याणहून ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणारी टीम अंबरनाथ स्थानकात दाखल झाली आणि त्यानंतर तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं.

दरम्यान, पेंटाग्राफ तुटल्यावर त्याचे तुकडे पार्सलच्या डब्यात दरवाज्यात बसलेल्या कमलेश जादवानी यांच्या पायात घुसले, त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय.