मुंबई : भोईवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा (Parel Minor Boy Missing Case) 24 तासाच्या आत शोध घेऊन त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिलं. परेल स्थानकावर आजीचा हात सुटल्याने हा मुलगा गर्दीत हरवला होता. नंतर या मार्गावरच्या सर्व स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी नालासोपारा येथून या मुलाचा शोध लावला. मुंबई भोईवाडा पोलिसांच्या (Bhoiwada Police) या उत्तम कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केलं आहे.
भोईवाडा पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर रोजी एक 12 वर्षाचा मुलगा हरवला असल्याची तक्रार दिली होती. हा मुलगा आजीसोबत ट्युशनकरता परेल येथे जात असताना परेल टीटी, मुंबई येथे आजीचा हात सुटल्याने गर्दीमध्ये कुठेतरी हरवला होता. त्यानंतर तो मुलगा घरी परतलाच नव्हता. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती.
तब्बल 15 रेल्वे स्थानकांचे सीसीटीव्ही तपासले
गुन्हे पथकाचे अमित कदम आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन आजूबाजूच्या परिसरातील गार्डन्स, रेल्वे स्टेशन येथे मुलाचा शोध सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने परेल, प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा मुलगा हा प्रभादेवी रेल्वे स्टेशन येथे दिसून आला. प्रभादेवी रेल्वे स्टेशन येथून त्याने विरारच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन पकडल्याचे दिसून आल्याने प्रभादेवी ते विरार रेल्वे स्टेशनच्या दरम्यानचे 14 ते 15 रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज अतिशय बारकाईने तपासण्यात आले.
सदरचा मुलगा नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे ट्रेन मधून उतरल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे नालासोपारा रेल्वे स्थानक आणि बाहेरील परिसरातील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता मुलगा नालासोपार पूर्व येथे तुळींज रोडच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. हा मुलगा ब्रिजच्या खाली बसलेला दिसून आल्यानंतर त्यास पोलीस ठाण्यामध्ये आणून सुखरुपपणे त्याच्या पालकांचे ताब्यात देण्यात आले.
ही बातमी वाचा: