Pahalgam Terror Attack: काश्मिरमधील (Kashmir) पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यात डोंबिवलीकर (Dombivli) संजय लेले (Sanjay Lele), अतुल मोने (Atul Mone) आणि हेमंत जोशी (Hemant Joshi) मृत्यूमुखी पडले. अतुल मोने यांची पत्नी आणि मुलगी ऋचा मोने (Rucha Mone) यांनी एबीपी माझाशी बातचित केली. पत्नी आणि मुलीसमोरच दहशतवाद्यांनी अतुल मोने यांना गोळ्या झाडल्या. याचसंदर्भात त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं? हे सविस्तरपणे सांगितलं. अतिरेकी फक्त हिंदूंना मारायला आले होते, अजान आणि कलमा म्हणायला लावत होते. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंची मुलगी आणि पत्नीनं हल्ल्यादरम्यानचा थरार सांगितलाय.
ऋचा मोनं सांगितलेला थरार ऐकून मन पुरतं हेलावतं. ऋचासमोरच तिच्या काका आणि वडिलांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. तिघांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं ऋचानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. यासर्व गोष्टींचा हादरवणारा, खळबळजनक खुलासा ऋचानं सांगितला आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने हिनं एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह बातचित केली. ज्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला, त्यावेळी ऋचा तिथेच होती. दहशतवाद्यांना घाबरुन ज्यावेळी ऋचा जमिनीवर झोपली, तिच्या डोळ्यांसमोरच तिच्या काकांचा, संजय लेलेंचा मृतदेह पडला होता. दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्यांच्या डोक्यातून वाहणारं रक्त ऋचा तिच्या डोळ्यांनी पाहत होती. तिनं घटनेचा थरार सांगितला आहे.
अचानक फायरिंग सुरू झाली : ऋचा मोने
ऋचा मोनेनं सांगितलं की, " मिनी स्वित्झर्लंडला होतो, तिथे बराच वेळ होतो, सगळं व्यवस्थित चालू होतं, आम्ही निघत होतो, तर अचानक फायरिंग सुरू झाली.सगळे एका दिशेला पळत होते. खाली झोपत होते, मीसुद्धा तेच केलं, मीसुद्धा झोपले खाली. मी मान वर करुन पाहिलं, फायरिंग सुरूच होती. मी दोन जणांना फायरिंग करताना पाहिलं, अजूनही काहीजण असू शकतात. मी थोड्या वेळानं डोकं वर करुन पाहिलं. त्यांनी लोकांना गोळ्या घालायला सुरुवात केलेली."
"दहशतवाद्यांनी विचारलं की, हिंदू कोण मुस्लीम कोण?"
"आम्ही जिथे सगळे एकत्र होतो, तिथे सगळे आलेले. मग तिथे येऊन विचारलं की, हिंदू कोण मुस्लीम कोण? त्यावेळी माझ्या काकांनी संजय लेलेंनी थोडा हात वरती केला, त्यांना डोक्यात गोळी घातली माझ्या समोरच. त्यांच्या मागेच होती मी, ते सर्व मी पाहिलं, त्यानंतर हेमंत काका त्यांना विचारायला गेला की, काय झालं? मग त्यांनाही त्यांनी लगेच शूट केलं. मग माझे बाबा बोलले की, गोळी मारू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही इथेच बसतो. तिथे माझी आई होती, बाबांच्या मागे मी होते. मी सुद्धा खूप घाबरलेले. आई पुढे बाबाला कव्हर करायला गेलेली, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही, त्यांना बाबाच्या पोटात गोळी मारली.", असं ऋचा मोने म्हणाली.
"संजय काकाच्या डोक्यात गोळी घातली, रक्त वाहताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय..."
ऋचा मोने म्हणाली की, "मी खूप घाबरले मी जमिनीवर खाली झोपले, तिथे माझा भाऊ, माझी काकी होती मी त्यांच्याजवळ गेले. आई बाबाजवळच होती, तिथेच खाली झोपून होती. मला काहीच सूचत नव्हतं. मी जिथे खाली झोपलेले तिथेच संजय काकांचं डोकं होतं. रक्त येत होतं पूर्ण, मी माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण रक्त वाहताना पाहत होते. मला काहीच सूचत नव्हतं."
दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तेव्हा यात ऋचाचे वडील अतुल मोने यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबतच असलेला तिचा भाऊ हर्षल मोनेच्या हाताला गोळी चाटून गेली.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिघांना प्राण गमवावे लागले. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या तिघांमधला जिव्हाळा नातेवाईकांमध्ये नेहमीच कौतुकांचा विषय असायचा. लेकरांची परीक्षा संपली म्हणून ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. मात्र बैसरनच्या खोऱ्यात त्यांची गाठ माणसाच्या मुखवट्याड दडलेल्या सैतानांशी पडली. त्यानंतर पुढे जे घडलं ते फक्त त्यांच्या कुटुंबीयांनात नाहीतर, संपूर्ण देशाच्या मनाला कायमच्या जखमा देणारं आहे.
पाहा व्हिडीओ : Atul Mone Family Pahalgam attack : आईने कव्हर केलं, पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pahalgam Attack Dombivli: दहशतवाद्यांनी तुम्हाला धर्म विचारुन गोळ्या घातल्या का? डोंबिवलीच्या अतुल मोनेंच्या पत्नी आणि मुलीने काय सांगितलं?
- आईने कव्हर केलं, पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या, अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली हादरवणारी कहाणी
- 'मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, दहशतवाद्यांनी कपडे काढून त्याला गोळ्या मारल्या; कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सगळं सांगितलं