मुंबई : मुंबईमध्ये मागील दोन महिन्यानंतर काल मंगळवारी पहिल्यांदाच सर्वात कमी 806 कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीत काल केवळ एक रुग्ण आढळला आहे. मुंबईत आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या 86,132 झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा हा पाच हजारांवर पोहोचली आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सांगितलं की, काल कोरोनाबाधित 806 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संख्या 86,132 झाली आहे.

806 हा आकडा मुंबईत मागील 55 दिवसांनंतर रोजचा सर्वात कमी आकडा आहे. याआधी मुंबईत 13 मे रोजी 800 कोरोनाबाधित आढळले होते. मुंबईत पहिला कोरोना रुग्ण 11 मार्च रोजी आढळला होता. तर 17 मार्च रोजी पहिला मृत्यू झाला होता. बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे की, 985 रुग्णांना काल हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिला आहे. आता मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 58,137 झाली आहे. आता शहरात 22,996 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची गरज नाही, बीएमसीचे सुधारित आदेश लागू

राज्यात काल 5 हजार 134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल 5 हजार 134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 17 हजार 121 इतकी झाली आहे. काल 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 89 हजार 294 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात काल 224 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 (18.69 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 985 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 463 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.6 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 18 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची गरज नाही : बीएमसी
मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच डॉक्टरांच्या 'प्रिस्क्रीप्शन' शिवाय कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे आता बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील निर्धारित खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोविड विषयक चाचणी ही थेटपणे संपर्क साधून करवून घेता येणार आहे. यानुसार खाजगी प्रयोगशाळांमधून चाचणी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दर लागू असतील, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे. खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्यासाठी यापूर्वी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असणे गरजेचे होते. मात्र ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांची कोविड विषयक चाचणी सहजपणे करवून घेणे शक्य होणार आहे.