मुंबई : माहुलमध्ये कोणालाही स्थलांतरित करू नये, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. चेंबूरजवळ असलेल्या माहुलमध्ये दिवसेंदिवस प्रदुषण वाढत आहे, तसेच तेथील पाणीही प्रदुषित झालं आहे, अशा परिस्थितीत तेथे रहिवाशांना स्थलांतरीत करणं त्यांच्यासाठी धोकादायक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


माहुलमधील दहा इमारतींमध्ये पोलिसांना स्थलांतरीत करण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र अशा प्रदुषित वातावरणात पोलिसांना स्थलांतरीत करू नये. पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांसह याठिकाणी स्थलांतर केलं तर तो त्यांच्यावर अन्याय होईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.


मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील झोपड्या हटवून रहिवाशांना माहुलला स्थलांतरीत केले जात आहे. मात्र सध्या जे माहुलमध्ये वास्तव्याला आहेत त्यांनाच माहुलमधून बाहेर काढण्याची गरज आहे. राज्य सरकारनं माहुलवासियांच्या सदृढ आयुष्यासाठी त्यांना दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.