मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे पुढील आठवड्यात रंगणारी पहिली वहिली विश्वस्तरीय मल्लखांब स्पर्धा आयोजकांना आता शांततेत पार पाडावी लागणार आहे. कारण लाऊड स्पीकर्सला सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर हायकोर्टात धाव घेणाऱ्या विश्व मल्लखांब संघटना आणि दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरला मुंबई उच्च न्यायालयानं कोणताही दिलासा देण्यास शुक्रवारी नकार दिला.



खरंतर भारताच्या मातीत जन्मलेल्या आपल्या या पारंपारिक खेळ आणि व्यायमप्रकराला राज्य सरकारनं भक्कम पाठींबा आणि प्रोत्साहन देण्याची गरज होती. एरवी राजकीय पक्ष आणि त्यांच्या वार्षिक मेळाव्यांना दिवस वाटून देणाऱ्या राज्य सरकारनं इथं मात्र याचिकाकर्त्यांच्या या रास्त मागणीला जोरदार विरोध केला. शिवाजी पार्क हे शांतताप्रवण क्षेत्र असल्यामुळे इथं लाऊड स्पीकर्स लावता येणार नाहीत अशी बाजू राज्य सरकारने खंडपीठासमोर मांडली. खेळाच्या मैदानात अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेला परवानगी नाकारण्याच्या मनस्थितीत हायकोर्ट दिसत नव्हतं मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत हायकोर्टानं नाईलाजानं याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.


देशविदेशातील मातब्बर मल्लखांबपटूंना एकत्र आणत विश्व मल्लखांब संघटनेच्या मान्यतेनं भारतीय मल्लखांब महासंघ आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्यातर्फे मल्लखांबाची पहिली 'विश्व अजिंक्यपद स्पर्धा'  16  आणि 17 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर ध्वनीप्रदुषणाच्या नियमामुळे वर्षभरातील केवळ 45  दिवस लाऊड स्पीकर्स लावण्यास परवानगी दिली जाते. वेकॉम ट्रस्टच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.


विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेसाठी शिवाजी पार्कमध्ये भव्य वातानुकूलित शामियाना उभारण्यात येणार आहे. यजमान भारतासह जर्मनी, झेक रिपब्लिक, बांगलादेश, स्पेन, इटली, अमेरिका, इराण, नॉर्वे, इंग्लंड, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम अशा एकूण 15 देशांचे 150 खेळाडू आणि अधिकारी या स्पर्धेत भाग घेणार आहेत. या स्पर्धेकरिता चार ते पाच हजार प्रेक्षक हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या आयोजनात लाईड स्पीकर्स नसल्यानं आयोजकांची मोठी पंचाईत झाली आहे.