मुंबई : देशात अशांतता निर्माण करून हिंदू नेते तसेच बड्या पत्रकरांना जीवे मारण्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपात अटक झालेल्या तिघांना काल मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. तर दोघांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. या सर्वांना एनआयएनं नांदेडमधून अटक केली होती.


राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) 2012 मध्ये नांदेडमधून मोहम्मद अक्रम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास या पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.


एनआयएनच्या आरोपांनुसार, अक्रम रोजगाराचे कारण सांगून सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्य करून तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांच्या संपर्कात आला. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये अक्रमने त्याच्या साथीदारांसह नांदेड, हैदराबाद आणि बेंगळूरुसह भारतातील विविध भागातील प्रमुख हिंदू नेते, जेष्ठ पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, आरोपींच हे षड्यंत्र कार्यरत होण्याआधीच त्यांना अटक करण्यात असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले. 


मंगळवारी न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. तेव्हा, मोहम्मद अक्रम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक यांना बेकायदेशीर कृती प्रतिबंधक अधिनियम (युएपीए) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. तर मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास या दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.