दिवा रुळ प्रकरणी NIA-ATS चौकशी, दहशतवादी संबंधांचा संशय
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 26 Jan 2017 05:17 PM (IST)
मुंबई : दिवा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या रुळ प्रकरणाची एनआयए आणि एटीएसकडून चौकशी होणार आहे. या घटनेमागे दहशतवादांचा हात आहे का, या अनुषंगानं तपास केला जाणार आहे. बुधवारी दिवा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर 15 फुटी रुळाचा तुकडा ठेवण्यात आला होता. मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लोको पायलट हिरेंद्र कुमार आणि असिस्टंट लोकल पायलट हितेश चिंचोळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. घातपातासाठी रेल्वेमार्गावर आडवा रुळ ठेवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची एनआयए आणि एटीएस सारख्या तपासयंत्रणांकडून चौकशी केली जाणार आहे. अपघात टाळणाऱ्या पायलट आणि लोकोपायलट्सना 5 हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. दोघांच्या प्रसंगावधानामुळे जवळपास सातशे प्रवाशांचे प्राण बचावले. काय आहे प्रकरण ? बुधवार 25 जानेवारी रोजी दिव्यात मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला. गाडीच्या लोको पायलटने ट्रॅकवर 15 फुटी जुना रुळ ठेवल्याचं पाहिलं आणि तात्काळ गाडी थांबवली. स्थानिकांच्या मदतीने रुळ बाजूला करण्यात आला आणि गाडी पुढे काढली. मागच्या तीन महिन्यात देशात रेल्वेचे 3 मोठे अपघात घडले, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे हे अपघात आहेत, की घातपात, या शंकेने पुन्हा डोकं वर काढलं आहे.