ठाणे : रिक्षावाल्यांनी भाडं नाकारल्यानं अनेकदा प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं, पण  ठाणे शहरात लवकरच 'हो रिक्षा' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाचणार असून रिक्षाचालकांचाही फायदा होणार आहे.


'हो रिक्षा'.. नाव काहीतरी वेगळं वाटतंय ना? पण या नावातच सारं काही दडलं आहे. कारण या उपक्रमात रिक्षाचालकांना प्रत्येक प्रवाशाला 'हो' म्हणणं गरजेचं असणार आहे. आत्तापर्यंत कुठेही न वापरली गेलेली ही संकल्पना लवकरच ठाण्यात अस्तित्वात येणार आहे. या संकल्पनेत रिक्षेच्या पुढे दर्शनी भागावर 'हो रिक्षा' नावाचा स्टिकर लावण्यात येणार असून त्यानंतर या रिक्षाचालकाला एकही भाडं नाकारता येणार नाही.

अशाप्रकारे दिवसभर एकही भाडं न नाकारणाऱ्या रिक्षाचालकांपैकी ५ रिक्षाचालकांना दररोज १५० रुपयांच्या किराणा खरेदीचे व्हाउचर्स देण्यात येणार आहेत. ठाणे शहरातलं अग्रगण्य दैनिक ठाणे वैभव आणि अपना बाझार यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येणार असून १ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते त्याची सुरुवात होणार आहे.

जे रिक्षाचालक स्टिकर लावूनही भाडं नाकारतील, त्यांना या योजनेतून तात्काळ बाद केलं जाणार आहे. याबाबतची तक्रार आरटीओ किंवा ठाणे वैभवकडे करावी लागणार आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप तर वाचणार आहेच, पण प्रामाणिक रिक्षाचालकांचा फायदाही होणार आहे. त्यामुळं ठाण्यातल्या ३० हजार रिक्षाचालकांपैकी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ठाणे शहरात पहिल्यांदाच राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाचं ठाणे शहरातल्या प्रवाशांनी आणि रिक्षाचालकांनीही स्वागत केलं आहे.