NEET paper leak case : नीट पेपरफुटीविरोधात मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. गुन्हे मागे घेण्याच्या कार्यपद्धतीची विचारणा केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही नोटीसा येत असून काही प्रकरणांमध्ये तपास अद्याप सुरु असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी पोलीस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात केला आहे.  

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा

गुन्हे मागे घेण्यासाठीच्या कालमर्यादेची तसेच इतरही अनेक बाबींची आदित्य ठाकरेंकडून पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे विचारणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता गुन्हे मागे घेण्याच्या शासनाच्या निर्णयाची एकसमान आणि तात्काळ अंमलबजावणीची मागणी देखील पत्रात करण्यात आली आहे. नीट पेपरफुटीविरोधात मुंबईसह राज्यातील विविध भागात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तरुणांनी केली होती. अखेर या मागणीला यश आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनादरम्यान, अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे.

पत्रात कोणते मुद्दे मांडलेत?

1) गृहविभागाच्या निर्देशांचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित गुन्हे, एफआयर व प्रलंबित खटल्यांना लागू होणार आहे का?

2) ज्या विद्यार्थ्यांना भारतीय न्याय संहिता किंवा इतर खायद्याखाली नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, किंवा त्यांच्यावरील तपास सुरु आहे, त्यांच्यावरील पुढील तपास आणि दंडात्मक कारवाई स्थगित करण्यात येणार आहे का?

3) शासनाच्या निर्णयानुसार गुन्हे मागे घेण्याची नेमकी कार्यपद्धती काय असणार आहे.

4) संबंधित पोलीस ठाणे स्वत:हून गुन्हे मागे घेण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहेत का? अथवा संबंधित विद्यार्थी किंवा त्यांच्या वकिलांनी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे का?

5) न्यायालयात प्रलंबित गुन्हे मागे घेण्यासाठी फोरदारी प्रक्रिया संहितेतील संबंधित तरतुदीनुसार सरकारी अभियोत्यामार्फत अर्ज दाखल करण्यात येणार आहे का? असल्यास त्यासाठी कोणती कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे?

6) राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व पोलिस ठाण्यांना यासंदर्भात एकसमान परिपत्रक अथवा एसओपी जारी करण्यात आली आहे का? असल्यास ची सार्वजनिक करण्यात यावी. 

7) ज्या विद्यार्थ्यांवर अद्याप अटक, चौकशी, हजेरी किंवा इतर कोणत्याही प्रकारची कारवाई सुरु आहे, त्याबाबत तात्काळ कोणते निर्देश देण्यात आले आहेत?

अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाने घेतलेले निर्णय केवळ कागदावर न राहता त्याची संपूर्ण राज्यात एकसमान प्रभावी अंमलबजालणी गोणे अत्यंत गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.