मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड (Beed) जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने मंत्रालयीन विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्याने सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करावा.
ऊसतोड कामगारांसाठीच्या या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळेल, असा विश्वास गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या व समिती अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत.
पुण्यातील अर्भक घटनेची दखल
पुणे जिल्ह्यातील दौंड येथील गोपाळवाडी परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्येच्या संभाव्य प्रकरणांकडे लक्ष वेधले असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही घटना अत्यंत गंभीर असून, त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. सात ते आठ अर्भकांचे अवयव एका बाटलीत सापडणे हे केवळ अपघाताने घडलेली घटना नसून, एका मोठ्या बेकायदेशीर गर्भपात साखळीचा भाग असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, दौंड परिसरातील खासगी दवाखाने, प्रसुतीगृहे, वैद्यकीय व्यावसायिक आणि दलालांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशय या घटनेतून व्यक्त केला जात आहे. सोनोग्राफी केंद्रे आणि खासगी दवाखान्यांची सखोल तपासणी करून कोणत्याही स्वरूपात लिंगनिदान आणि त्यानंतर गर्भपात केले जात असल्यास, त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी. तसेच, सापडलेल्या अर्भकांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करून त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची शास्त्रीय तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई करताना दुर्घटना; कुलरचा शॉक लागून सख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा